ओस्लो : भारताची युवा ग्रँडमास्टर दिव्या देशमुखने प्रतिष्ठेच्या नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत संस्मरणीय पदार्पण करताना पहिल्याच फेरीत महिला जगजेत्या जू वेन्जूनचा ‘आर्मागेडॉन’ डावात पराभव केला. विशेष म्हणजे, नागपूरच्या २० वर्षीय दिव्याने काळ्या मोहर्यांनी खेळताना बाजी मारली. खुल्या विभागात जगज्जेता दोम्माराजू गुकेश, आर. प्रज्ञानंद या भारतीयांनीही सकारात्मक सुरुवात केली.
रेटी/कॅटलान पद्धतीने खेळल्या गेलेल्या लढतीत दिव्याने पटाच्या मध्यभागावर नियंत्रण राखत जू वेन्जूनला प्रत्येक चालीसाठी विचार करायला भाग पाडले. दिव्याने हत्तीचा प्रभावी वापर करत बचाव भक्कम ठेवला. वेन्जूनने राजाच्या बाजूने आक्रमक चाली रचण्याचा प्रयत्न केला, पण दिव्याने अचूक खेळ करत वेन्जूनच्या राजावर दडपण निर्माण केले. अखेरीस ५२ चालींनंतर पारंपरिक डाव बरोबरीत सुटला. त्यानंतर बरोबरीची कोंडी फोडण्यासाठी झालेल्या ‘आर्मागेडॉन’ डावात दिव्याने शानदार खेळ करत विजय मिळवला.
‘आर्मागेडॉन’ डावात पांढर्या मोहर्यांनी खेळणार्या खेळाडूला १० मिनिटे, तर काळ्या मोहर्यांनी खेळणार्या खेळाडूला ७ मिनिटांचा वेळ दिला जातो. पांढर्या मोहर्यांनी विजय मिळवणे आवश्यक असते, तर काळ्या मोहर्यांनी बरोबरीही पुरेशी ठरते. या दडपणाखाली दिव्याने संयम राखत विजय मिळवला. तिने अश्वाच्या अप्रतिम चालीने वेन्जूनला शरणागती पत्करण्यास भाग पाडले. त्या चालीमुळे वेन्जूनवर वजीर गमावण्याची वेळ आली आणि त्यानंतर पुनरागमन करणे तिला अशक्य झाले.
खुल्या विभागात गुकेश आणि प्रज्ञानंद यांनी आपल्या सामन्यांत ‘आर्मागेडॉन’ टायब्रेकमध्ये विजय मिळवला. गुकेशला जर्मनीचा ग्रँडमास्टर व्हिन्सेन्ट केमेरविरुद्ध संघर्ष करावा लागला. या दोघांमधील पारंपरिक डाव जवळपास पाच तास आणि १४४ चालींनंतर बरोबरीत सुटला. त्यानंतर टायब्रेकमध्ये गुकेश विजयी ठरला. दुसरीकडे, प्रज्ञानानंदने अमेरिकेचा ग्रँडमास्टर वेस्ली सो याच्याविरुद्ध पारंपरिक डाव बरोबरीत सोडवल्यानंतर ‘आर्मागेडॉन’मध्ये बाजी मारत १.५ गुण मिळवला.
महिला विभागातील अन्य भारतीय बुद्धिबळपटू कोनेरू हम्पीने मात्र निराशाजनक कामगिरी केली. तिला बिबिसारा असाउबायेवाने पारंपरिक डावातच पराभूत केले.
कार्लसनला धक्का
मायदेशात विक्रमी आठव्या जेतेपदासाठी प्रयत्नशील असलेल्या मॅग्नस कार्लसनला पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला. फ्रान्सच्या अलिरेझा फिरुझाने पाच वेळच्या जगज्जेत्या कार्लसनवर पारंपरिक डावातच मात केली. पायाला दुखापत असूनही या स्पर्धेत सहभाग नोंदवणार्या फिरुझाचा कार्लसनवर हा पहिला ‘पारंपरिक’ विजय ठरला. ‘‘फिरुझाने मला सतत दडपणाखाली ठेवले आणि माझ्याकडून चुका झाल्या,’ असे कार्लसनने लढतीनंतर मान्य केले.
