ओस्लो : नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेच्या सहाव्या फेरीत भारतीय खेळाडूंनी निराशा केली. खुल्या विभागात जगज्जेता दोम्माराजू गुकेश आणि आर. प्रज्ञानंद, तर महिलांमध्ये दिव्या देशमुख आणि कोनेरू हम्पी यांना पराभवाचा सामना करावा लागला. विशेषत: दिव्याला अपयशाचा मोठा फटका बसला आहे.

दिव्याला चीनच्या पाच वेळच्या जगज्जेत्या जू वेन्जूनकडून ‘क्लासिकल’ (पारंपरिक) सामन्यात हार पत्करावी लागली. या पराभवामुळे दिव्याची (८.५ गुण) अव्वल स्थानावरून दुसर्‍या स्थानी घरसण झाली आहे. कझाकस्तानच्या बिबिसारा असाउबायेवा हिने हम्पीविरुद्धचा ‘क्लासिकल’ सामना बरोबरीत सोडवल्यानंतर ‘आर्मागेडॉन’ टायब्रेकमध्ये विजय मिळवला. त्यामुळे बिबिसाराचे आता ९.५ गुण झाले असून तिने पुन्हा अग्रस्थानी झेप घेतली. हम्पीसाठी ही स्पर्धा निराशाजनक ठरत असून तिच्याकडे केवळ ५.५ गुण आहेत. गुणतालिकेत ती तळाला आहे.

खुल्या विभागात, अमेरिकेच्या वेस्ली सो याने प्रज्ञानंदचा ‘क्लासिकल’ सामन्यात पराभव केला. त्यामुळे त्याने एकूण ११.५ गुणांसह गुणतालिकेत आघाडी घेतली आहे. या पराभवानंतर प्रज्ञानंद सहा गुणांसह सहा खेळाडूंच्या विभागात तळाला पोहोचला. गेल्या सामन्यात प्रज्ञानंदला मात देणार्‍या गुकेशलाही अपयशाचा सामना करावा लागला. जर्मनीच्या व्हिन्सेन्ट केमेरने त्याला पराभूत केले. वेळेच्या तीव्र दडपणाखाली खेळताना गुकेशला आपली स्थिती सावरता आली नाही. या विजयामुळे केमेरचे आठ गुण झाले, तर गुकेश ६.५ गुणांवर राहिला. दरम्यान, जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसन याने अलिरेझा फिरुझावर ‘क्लासिकल’ विजय मिळवत मुसंडी मारली. कार्लसनचे आता ७.५ गुण झाले असून तो चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. स्पर्धेत आता चार फेर्‍या शिल्लक आहेत.