करोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सुमारे ४ महिन्यांपेक्षा जास्त काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट बंद होतं. इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाली. फक्त आयसीसीने अद्याप प्रेक्षकांना मैदानात सामना पाहण्याची परवानगी दिलेली नाही. सध्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मर्यादीत षटकांची क्रिकेट मालिका सुरु आहे. पहिल्या टी-२० सामन्यात यजमान इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर २ धावांनी मात केली. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातलं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं द्वंद्व प्रत्येकाला माहिती आहे. अनेकदा ऑस्ट्रेलियन खेळाडूंना इंग्लंडमध्ये तर इंग्लंडच्या खेळाडूंना ऑस्ट्रेलियात प्रेक्षकांकडून शिवीगाळ ऐकावी लागते.

मात्र यंदा पहिल्यांदाच करोनामुळे या परिस्थितीत फरक पडला आहे. “इंग्लंडमध्ये खेळायला आलोय आणि मला कोणी शिवीगाळ केली नाही असं पहिल्यांदाच झालंय, मला बरं वाटलं.” ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने सामना संपल्यावर आपली प्रतिक्रीया दिली. पहिल्या टी-२० सामन्यात डेव्हिड वॉर्नरने अर्धशतकी खेळी केली, पण आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात तो अयशस्वी ठरला.

प्रेक्षकांची उपस्थिती या दृष्टीकोनातून पहिला सामना कसा वाटला याबद्दल विचारलं असता वॉर्नर म्हणाला…”प्रेक्षकांविना खेळताना थोडं विचीत्र वाटलं. मैदानात येत असताना तुम्हाला प्रेक्षकांची सवय असते. म्हणून घरच्या मैदानावर आणि बाहेरच्या मैदानावर खेळण्यात मजा असते. पण सध्याची परिस्थिती लक्षात घेता आम्हाला क्रिकेट खेळायला मिळतंय हीच महत्वाची गोष्ट आहे.” ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडकडे सध्या १-० ने आघाडी आहे.