Kolkata knight Riders vs Gujarat Titans: कोलकाता नाईट रायडर्सचा संघ अजूनही आपल्या पहिल्या विजयाचा शोधात आहे. १ गुण पावसामुळे मिळाल्यानंतर कोलकाताला ६ पैकी एकही सामना जिंकता आलेला नाही. अंजिक्य रहाणेच्या नेतृ्त्वाखाली खेळताना कोलकाताला लागोपाठ ५ सामने गमवावे लागले आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने पहिल्या डावात फलंदाजी करताना १८० धावा केल्या होत्या. १८१ धावांचा पाठलाग करताना कर्णधार शुबमन गिलने ८६ धावांची दमदार खेळी केली आणि गुजरातला ५ गडी राखून विजय मिळवून दिला. दरम्यान हा सामना गमावल्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे काय म्हणाला? जाणून घ्या.
सामना झाल्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे म्हणाला, “पराभव झाल्यानंतर सामन्याबद्दल बोलणं कधीच सोपं नसतं. मला सकारात्मक गोष्टींबद्दल बोलायला आवडेल. कॅमेरुन ग्रीनने अप्रतिम खेळी केली. तसेच शुबमन गिलनेही सुंदर फलंदाजी केली. आम्हाला पावरप्लेमध्ये विकेट्स हव्या होत्या. पण गिल आणि साई सुदर्शनने उत्तम फलंदाजी केली.”
तसेच ग्रीनने गोलंदाजी का केली नाही? या प्रश्नाचं उत्तर देताना रहाणे म्हणाला, “ग्रीनला क्रॅम्पचा त्रास होत होता, त्यामुळे तो गोलंदाजी करू शकला नाही. आम्हाला फक्त आमच्या खेळाचा आनंद घ्यायचा आहे आणि स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे. आज आम्हाला तेच करायचं होतं.”
या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या कोलकाताकडून कॅमेरुन ग्रीनने अर्धशतकी खेळी केली. पण त्याला इतर कुठल्याही फलंदाजाकडून साथ मिळाली नाही. कर्णधार अजिंक्य रहाणे शून्यावर माघारी परतला. तर अंगकृष रघुवंशी अवघ्या ८ धावांवर बाद झाला. कॅमेरुन ग्रीनने ७९ धावांची खेळी केली. रोमन पॉवेलने २७ धावांचे योगदान दिले. शेवटी रमनदीप सिंग १७ धावांवर बाद झाला.कोलकाताचा डाव १८० धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सकडून शुबमन गिलने सर्वाधिक ८६ धावांची खेळी केली. गुजरातने हा सामना ५ गडी राखून आपल्या नावावर केला. तर हा कोलकाताचा सलग पाचवा पराभव ठरला.
