भारतीय क्रिकेट संघ टी -२० विश्वचषकातील पहिला सामना २४ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. भारताने मुख्य सामन्यापूर्वी पहिल्या सराव सामन्यात सोमवारी इंग्लंडचा सात गडी राखून पराभव केला. सामन्यादरम्यान, नाणेफेक किंवा संघ निवडीबाबत कोणतीही विशिष्ट रणनीती नाही असे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी जोर देऊन म्हटले आहे. जो काही निर्णय होईल तो खेळपट्टीच्या परिस्थितीनुसार घेतला जाईल असेही शास्त्री यांनी म्हटले आहे. जे खेळाडू यूएईमध्ये आयपीएल २०२१च्या मोसमात सहभागी झाले आहेत त्यांना जास्त तयारीची गरज नाही असा विश्वास शास्त्री यांनी व्यक्त केला आहे.

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून शास्त्री यांची ही प्रशिक्षक म्हणून शेवटची स्पर्धा आहे आणि टी -२० विश्वचषक संपल्यानंतर ते पद सोडतील. त्याच्यांनंतर राहुल द्रविडला संघाचे पुढील मुख्य प्रशिक्षक बनवले जाऊ शकते.

“गेल्या दोन महिन्यांपासून खेळाडू आयपीएल खेळत आहेत, त्यामुळे त्यांना जास्त तयारीची गरज आहे असे मला वाटत नाही. त्यांना फक्त वातावरणाशी जुळवून घ्यावे लागणार आहे. त्यांना फक्त लयीत परत यावे लागेल. या खेळामध्ये प्रत्येकजण फलंदाजी करू शकतो आणि प्रत्येकजण गोलंदाजी करू शकतो. त्यामुळे तो कसा खेळ करत आहे याची कल्पना येण्यास आम्हाला मदत होईल,” असे  शास्त्री यांनी स्टार स्पोर्ट्सला सांगितले.

शास्त्रींनी स्पष्ट केले की सराव सामन्यांदरम्यान मुख्य उद्देश खेळाडूंच्या लयीचा अंदाज लावणे हा आहे. “आम्ही किती दव आहे हे पाहण्याचा प्रयत्न करू आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ किंवा त्यानुसार गोलंदाजी करू. यामुळे आम्हाला अतिरिक्त फिरकीपटू किंवा वेगवान गोलंदाज प्लेइंग इलेव्हनमध्ये ठेवायचे की नाही हे ठरवण्यात मदत होईल, असे शास्त्री म्हणाले.