मेलबर्न : एकीकडे टेनिस इतिहासातील सर्वकालीन सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक नोव्हाक जोकोविच, तर दुसरीकडे टेनिसचे वर्तमान आणि भविष्य म्हणून पाहिले जात असलेला कार्लोस अल्कराझ. हे दोन वेगवेगळ्या पिढीतील तारांकित टेनिसपटू ऑस्ट्रेलियन खुल्या ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या पुरुष एकेरीतील अंतिम लढतीत आज (रविवारी) आमनेसामने येतील, तेव्हा दोघांचाही ऐतिहासिक जेतेपदाचा मानस असेल.
सर्बियाच्या जोकोविचने प्रथितयश कारकीर्दीत आतापर्यंत २४ ग्रँडस्लॅम जेतेपदे पटकावली आहेत. पुरुष एकेरीतील हा विक्रम असला, तरी महिलांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या माजी टेनिसपटू मार्गारेट कोर्ट यांनी अशी कामगिरी केली आहे. त्यामुळे ३८ वर्षीय जोकोविचला रविवारी इतिहास रचण्याची संधी आहे. अल्कराझला पराभूत करण्यात यश आल्यास २५ एकेरी ग्रँडस्लॅम जेतेपदे मिळवणारा तो पहिला टेनिसपटू ठरेल. तसेच २०२३ सालापासून हे त्याचे पहिले जेतेपद असेल.
स्पेनचा अल्कराझलाही ऐतिहासिक कामगिरीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून कोर्टवर उतरणार आहे. २२ वर्षीय अल्कराझने आतापर्यंतच्या कारकीर्दीत फ्रेंच, विम्बल्डन आणि अमेरिकन या अन्य तीन ग्रँडस्लॅम स्पर्धा तीन वेळा जिंकल्या आहेत. मात्र, ऑस्ट्रेलियन स्पर्धेत तो अद्याप जेतेपदापर्यंत पोहोचू शकलेला नाही. यंदा त्याने प्रथमच अंतिम फेरीपर्यंतची मजल मारली आहे. आता ऑस्ट्रेलियातही यश मिळवल्यास तो चारही ग्रँडस्लॅम स्पर्धा किमान एकदा जिंकून ‘करिअर स्लॅम’ पूर्ण करणारा सर्वांत युवा टेनिसपटू ठरू शकेल. त्यामुळेच या लढतीबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.
’ वेळ : दुपारी २ वा.
’ थेट प्रक्षेपण : सोनी टेन २, ३
वर्चस्वाची संधी
* जोकोविच कारकीर्दीत ११व्यांदा ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेच्या अंतिम लढतीत खेळणार आहे. विशेष म्हणजे, त्याने याआधीच्या सर्व १० लढती जिंकून जेतेपद पटकावले होते. आता हे वर्चस्व कायम राखण्याची जोकोविचकडे संधी आहे.
* आता अल्कराझचे आव्हान परतवून लावायचे झाल्यास जोकोविचला सर्वोत्तम खेळच करावा लागेल. जोकोविच आणि अल्कराझ यांच्यात आतापर्यंत एकूण नऊ लढती झाल्या आहेत. यापैकी पाचमध्ये जोकोविच, तर चारमध्ये अल्कराझ विजयी ठरला आहे.
* यंदा ऑस्ट्रेलियन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दोघांनाही पाच सेटच्या लढतीत खेळावे लागले होते. अल्कराझने तब्बल ५ तास २७ मिनिटांच्या विक्रमी लढतीत ॲलेक्झांडर झ्वेरेवला नमवले होते. दुसरीकडे, जोकोविचने ४ तास ९ मिनिटांच्या लढतीत यानिक सिन्नेरचा पराभव केला होता.

