मेलबर्न : जगातील अव्वल टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिचची रविवारी ऑस्ट्रेलियातून परत पाठवणी झाली. त्यामुळे त्याला सोमवारपासून सुरू झालेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेला मुकावे लागलेच, शिवाय त्याच्यावर ऑस्ट्रेलियात तीन वर्षांच्या प्रवेशबंदीचेही संकट आहे. मात्र, ही बंदी हटवण्याचे ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी संकेत दिले आहेत.

लसीकरणाविना ऑस्ट्रेलियात दाखल झालेल्या जोकोव्हिचचा व्हिसा रद्द करण्याची सरकारची कृती केंद्रीय न्यायालयाने रविवारी वैध ठरवली. त्यामुळे त्याला ऑस्ट्रेलिया सोडावे लागले. परकीय नागरिक कायद्यांनुसार, त्याला पुढील तीन वर्षांसाठी ऑस्ट्रेलियाचा व्हिसा मिळू शकत नाही. परंतु बंदी घालण्यात आलेल्या व्यक्तीने मांडलेली बाजू पटल्यास परकीय नागरिकविषयक खात्याच्या मंत्र्यांना ही बंदी हटवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे जोकोव्हिचचा पुढील वर्षीच्या ऑस्ट्रेलियन स्पर्धेत खेळण्याचा मार्ग पूर्णपणे बंद झालेला नाही. ‘‘व्हिसा रद्द केल्यानंतर देशात प्रवेश करण्यासाठी पुढील तीन वर्षे बंदी असते. मात्र, योग्य कारणांसाठी त्या व्यक्तीवरील प्रवेशबंदी उठूही शकते. परिस्थितीचा विचार करून निर्णय घेतले जातात,’’ असे मॉरिसन म्हणाले.

जोकोव्हिचचा व्हिसा ऑस्ट्रेलियाचे परकी नागरिकविषयक खात्याचे मंत्री अ‍ॅलेक्स हॉक यांनी मागील शुक्रवारी रद्द केला. त्याने या निर्णयाविरोधात दाद मागितली. मात्र, रविवारी केंद्रीय न्यायालयाच्या तिन्ही न्यायाधीशांनी एकमताने जोकोव्हिचच्या विरोधात निकाल दिला.

फ्रेंच स्पर्धेसाठीही लशीची अट

पॅरिस : करोना प्रतिबंधात्मक लस घेतल्याशिवाय जोकोव्हिचला फ्रेंच खुल्या स्पर्धेतही प्रवेश दिला जाणार नाही, असे फ्रान्सच्या क्रीडा मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. ‘‘नवे नियम जाहीर झाल्यावर लसपत्राविना सार्वजनिक ठिकाणी जाता येणार नाही. हे नियम प्रेक्षकांपासून ते व्यावसायिक खेळाडूंपर्यंत सर्वाना लागू पडतील. फ्रेंच खुली स्पर्धा मे महिन्यात खेळवली जाणार आहे. तोपर्यंत परिस्थिती बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, नियम सर्वासाठी सारखेच असतील,’’ असे क्रीडा मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे. यंदा २२ मे ते ५ जूनदरम्यान फ्रेंच स्पर्धेचा थरार रंगण्याचे अपेक्षित आहे.

नदाल, बार्टीची विजयी सलामी

मेलबर्न : स्पेनचा २० ग्रँडस्लॅम विजेता खेळाडू राफेल नदाल आणि ऑस्ट्रेलियाची अग्रमानांकित खेळाडू अ‍ॅश्ले बार्टी यांनी सोमवारपासून सुरू झालेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत विजयी सलामी दिली. पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत नदालने अमेरिकेच्या मार्कोस गिरॉनचा ६-१, ६-४, ६-२ असा धुव्वा उडवला. तिसऱ्या मानांकित अलेक्झांडर झ्वेरेव्हने जर्मनीच्याच डॅनियल अल्टमाइरचा ७-६ (७-३), ६-१, ७-६ (७-१) असा पराभव केला. इटलीच्या माटेओ बेरेट्टिनीने अमेरिकेच्या ब्रँडन नाकाशिमावर ४-६, ६-२, ७-६ (७-५), ६-३ अशी मात केली. महिलांमध्ये बार्टीने युक्रेनच्या लेसिया सुरेंकोला ६-०, ६-१ अशी धूळ चारली. गतविजेत्या नाओमी ओसाकाने कोलंबियाच्या कामिला ओसोरिओला ६-३, ६-३ असे पराभूत केले.