जोकोव्हिचची विजयी सलामी

जपानच्या केई निशिकोरीने ऑस्ट्रेलियाच्या सॅम ग्रॉथवर ६-४, ६-३, ७-५ अशी मात केली.

संघर्षमय विजयानंतर प्रेक्षकांना अभिवादन करताना नोव्हाक जोकोव्हिच

 

अ‍ॅना इव्हानोव्हिकचे आव्हान संपुष्टात; व्हीनस विल्यम्स, समंथा स्टोसूर, गार्बिन म्युगुरुझा यांची विजयी आगेकूच

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी आणि अव्वल मानांकित नोव्हाक जोकोव्हिचने विम्बल्डन टेनिस स्पर्धेत विजयी सलामी दिली. अन्य खेळाडूंमध्ये व्हीनस विल्यम्स, डेव्हिड फेरर, मारिन चिलीच, समंथा स्टोसूर, सबिन लिसिकी यांनीही विजयी आगेकूच केली. मात्र अ‍ॅना इव्हानोव्हिकला सलामीच्या लढतीतच गाशा गुंडाळावा लागला.

फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या जेतेपदासह कारकीर्दीत ग्रँड स्लॅम जेतेपदांचे वर्तुळ पूर्ण करणाऱ्या जोकोव्हिचने दुसरी फेरी गाठली. मात्र त्याला नेहमीच्या सफाईदारपणे खेळ करता आला नाही. पहिल्या सेटमध्ये जोकोव्हिचने वॉर्डला एकही गुण मिळू न देता धुव्वा उडवला. मात्र दुसऱ्या सेटमध्ये युवा वॉर्डने तडफेने खेळ करत जोकोव्हिचला टक्कर दिली. क्रॉसकोर्ट, लॉब, ताकदवान फोरहँड अशा विविध फटक्यांद्वारे वॉर्डने मुकाबला ६-६ अशा स्थितीत नेला. मात्र यानंतर जोकोव्हिचने आक्रमक पवित्रा घेत दुसराही सेट जिंकला. तिसऱ्या सेटमध्ये लौकिकाला साजेसा खेळ करत जोकोव्हिचने दुसरी फेरी गाठली. पुढच्या फेरीत जोकोव्हिचची लढत फ्रान्सच्या अ‍ॅड्रियन मॅनारिओशी होणार आहे.

अन्य लढतीत फ्रान्सच्या पिअरी हय़ुजेस हर्बर्ट याने जर्मनीच्या फिलिप कोहेलश्रेबर या अनुभवी खेळाडूला ७-५, ६-३, ३-६, ६-३ असे संघर्षपूर्ण लढतीनंतर पराभूत केले. फ्रान्सच्या आद्रियन मॅनारिनो याने स्थानिक खेळाडू काईल एडमंड याचा ६-२, ७-५, ६-४ असा पराभव केला व दुसऱ्या फेरीत स्थान मिळविले. क्रोएशियाच्या मारिन चिलीचने विजयी वाटचाल करताना अमेरिकन खेळाडू ब्रायन बेकर याच्यावर ६-३, ७-५, ६-३ अशी मात केली. युक्रेनच्या सर्जी स्टॅखोवस्कीने जपानच्या योशिहितो निशिओका याला ६-३, ६-४, ६-४ असे सरळ तीन गेम्समध्ये पराभूत केले.

जपानच्या केई निशिकोरीने ऑस्ट्रेलियाच्या सॅम ग्रॉथवर ६-४, ६-३, ७-५ अशी मात केली. मिलास राओनिकने पाब्लो कारेनो बुस्टाचा ७-६ (७-४), ६-२, ६-४ असा पराभव केला.

स्टोसूरने पोलंडच्या मोग्दा लिनेटचे आव्हान ७-५, ६-३ असे चुरशीच्या लढतीनंतर संपुष्टात आणले. सॅबिनी हिने अमेरिकेच्या शेल्बी रॉजर्स हिचा ६-१, ६-३ असा सहज पराभव केला. कॅरिना विथोईटने २५व्या मानांकित इरिना कॅमेलिया बेगुवर सनसनाटी विजय नोंदविला. तिने हा सामना ६-१, ६-४ असा जिंकला.

गार्बिन म्युगुरुझाने कॅमिला जिओरर्जीवर ६-२, ५-७, ६-४ अशी मात केली. क्रमवारीत २२३व्या स्थानी असलेल्या एकाटेरिना अलेक्झांड्रोव्हाने   अ‍ॅना इव्हानोव्हिकला ६-२, ७-५ असे नमवत सनसनाटी विजयाची नोंद केली.  ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या पदार्पणात अ‍ॅनाला चीतपट करणाऱ्या एकाटेरिनाने कारकीर्दीत डब्ल्यूटीए दर्जाच्या स्पर्धेत केवळ एकमेव विजय मिळवला आहे. पुढच्या फेरीत एकाटेरिनाची लढत जर्मनीच्या अ‍ॅना लेना फ्राइडसमशी होणार आहे

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Novak djokovic beats james ward in wimbledon

ताज्या बातम्या