लंडन : सर्बियाचा तारांकित टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिचचा यंदाच्या विम्बल्डनमध्ये खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. करोना प्रतिबंधात्मक लस न घेतलेल्या जोकोव्हिचला वर्षांच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत खेळता आले नाही. मात्र, ब्रिटनमध्ये प्रवेश करण्यासाठी लसीकरण सक्तीचा नियम रद्द करण्यात आल्याने आता गतविजेत्या जोकोव्हिचला विम्बल्डनमध्ये खेळता येणार आहे.

‘‘विम्बल्डनमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना लस घेण्याचे आमचे आवाहन असेल. मात्र, आम्ही लसीकरणाची सक्ती करणार नाही,’’ असे ऑल इंग्लंड क्लबच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सॅली बोल्टन यांनी सांगितले. यंदाच्या विम्बल्डनला २७ जूनपासून प्रारंभ होणार आहे.

जागतिक क्रमवारीतील अग्रस्थानावरील जोकोव्हिचला ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेप्रमाणेच अमेरिकेत झालेल्या इंडियन वेल्स आणि मियामी खुल्या स्पर्धेलाही मुकावे लागले होते. ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेत परदेशी नागरिकांना लससक्ती करण्यात आली होती. मात्र, दोन वेळा करोनाची बाधा झालेल्या जोकोव्हिचने लस घेण्यास नकार दिला. आता २० ग्रँडस्लॅम विजेत्या जोकोव्हिचचा विम्बल्डनचे जेतेपद राखण्याचा प्रयत्न असेल.