कारकिर्दीतील विक्रमी २५व्या ग्रँडस्लॅम जेतेपदासाठी प्रयत्नशील नोव्हाक जोकोव्हिचला विम्बल्डन स्पर्धेच्या सेमी फायनलच्या लढतीत धक्कादायक पराभवाला सामोरं जावं लागलं. सेमी फायनलच्या लढतीत यानिक सिनरने जोकोव्हिचचा ६-४, ६-४, ६-४ असा धुव्वा उडवला. ३९वर्षीय जोकोव्हिच २५व्या ग्रँडस्लॅम जेतेपदासाठी आतूर होता.
क्वार्टरफायनलच्या प्रदीर्घ काळ चाललेल्या लढतीचा थकवा जोकोव्हिचला सेमी फायनलच्या लढतीतही जाणवत होता. विजिगीषु वृत्ती आणि अद्भुत फिटनेस यासाठी ओळखल्या जाणाऱ्या जोकोव्हिचला विक्रमी जेतेपदासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. फायनलमध्ये सिनरसमोर अलेक्झांडर झरेव्हचे आव्हान असणार आहे.
टेनिस विश्वात ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, विम्बल्डन आणि युएस ओपन अशा चार मानाच्या ग्रँडस्लॅम स्पर्धा होतात. २४ जेतेपदांसह जोकोव्हिच पुरुष टेनिसपटूंमध्ये जेतेपदांच्या बाबतीत अव्वल स्थानी आहे. महिला टेनिसपटू मार्गारेट कोर्ट यांच्या नावावर २४ ग्रँडस्लॅम जेतेपदं आहेत. पुरुष टेनिसपटूंमध्ये राफेल नदालच्या नावावर २२ तर रॉजर फेडररच्या नावावर २० जेतेपदं आहेत. या तिघांनी गेले दोन दशकं ग्रँडस्लॅम जेतेपदांवर सद्दी राखली आहे.
नदाल आणि फेडरर दोघेही निवृत्त झाले आहेत. मात्र चाळिशीच्या उंबरठ्यावर असलेला जोकोव्हिच आजही ग्रँडस्लॅम जेतेपदाच्या शर्यतीत आहे. कारकिर्दीत सुरुवातीला जोकोव्हिचला दम्याचा त्रास होता. त्यावर मात करुन त्याने फेडरर आणि नदालची मक्तेदारी मोडून काढत स्वत:चं स्थान निर्माण केली.
