दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविचने २०२६ च्या ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या जानिक सिनरला पराभूत करून आपलं स्थान पक्क केलं. तो आता त्याच्या २५ व्या ग्रँड स्लॅम जेतेपदापासून एक पाऊल दूर आहे. अंतिम फेरीत त्याचा सामना जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या कार्लोस अल्काराझशी होईल.
नोवाक जोकोविचने हा सामना ३-६, ६-३, ४-६, ६-४, ६-४ असा जिंकला. हा सामना सुमारे चार तास १० मिनिटे चालला, ज्यामध्ये जोकोविचने सिनरची पाच सामन्यांची विजयी मालिका मोडली. यासह आता ऑस्ट्रेलियन ओपनमधील अंतिम सामना अटीतटीचा होणार आहे आणि कोण यात बाजी मारणार यावर सर्वांच्या नजरा आहेत.
पहिला सेट गमावल्यानंतर ३८ वर्षीय जोकोविचने जोरदार पुनरागमन केलं. त्याने दुसरा आणि चौथा सेट जिंकला, तर सिनरने पहिला आणि तिसरा सेट जिंकला. अखेरच्या पाचव्या सेटमध्ये, जोकोविचने सर्व्हिस होल्ड करत सामना संपवला. हा जोकोविचची ही ११वी ऑस्ट्रेलियन ओपन फायनल असणार आहे, ज्यामध्ये तो कधी पराभूत झालेला नाही. त्याने १०वेळा ऑस्ट्रेलियन ओपनचं जेतेपद पटकावलं आहे आणि आता तो २५वं ग्रॅडस्लॅम जिंकण्याच्या एक पाऊल दूर आहे, जो मोठा विक्रम असणार आहे.
अंतिम फेरीत कार्लोझ अल्काराझशी होणार सामना
आता अंतिम फेरीत नोवाक जोकोविचचा सामना जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या कार्लोस अल्काराझशी होईल, ज्याने पहिल्या उपांत्य फेरीत अलेक्झांडर झ्वेरेवला पाच सेटच्या सामन्यात पराभूत केलं होतं. कार्लोस अल्काराझचा सामना सुमारे पाच तास आणि २७ मिनिटे चालला, ज्यामुळे तो स्पर्धेच्या इतिहासातील तिसरा सर्वात मोठा सामना ठरला.
ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये कार्लोस अल्काराझचा हा पहिलाच अंतिम सामना असेल. जर हा सामना त्याने जिंकला तर तो करिअर ग्रँड स्लॅम पूर्ण करणारा सर्वात तरुण पुरुष खेळाडू बनेल. ऑस्ट्रेलियन ओपनचा अंतिम सामना रविवार, १ फेब्रुवारी २०२६ रोजी खेळवला जाईल. दिग्गज खेळाडू की नवा तरूण खेळाडू कोण बाजी मारणार, यावर सर्वांच्या नजरा असतील. टेनिस जगत या ऐतिहासिक अंतिम फेरीची आतुरतेने वाट पाहत आहे, जिथे जोकोविचचा २५ वा ग्रँड स्लॅम आणि अल्काराझचा पहिला ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपदाचा सामना असणार आहे.

