वृत्तसंस्था, मेलबर्न
कारकीर्दीत स्लॅम पूर्ण करण्याचे स्वप्न बाळगून असलेल्या इगा श्वीऑटेकला मात्र या वेळी ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत अपेक्षित सुरुवात करता आली नाही. अडथळ्यांवर मात करीत पुढच्या फेरीत आगेकूच केली. तसेच, जेतेपदाच्या प्रबळ दावेदारांपैकी एक असलेल्या नोव्हाक जोकोविचने विजय नोंदवत पुरुष एकेरीची दुसरी फेरी गाठली.
पहिल्या फेरीच्या लढतीत दुसऱ्या मानांकित श्वीऑटेकने चीनच्या पात्रता फेरीतून आलेल्या युआन युए हिचा ७-६(७-५), ६-३ असा पराभव केला. सामन्याच्या पहिल्या सेटमध्ये श्वीऑटेकला युआनचे आव्हान मिळाले. मात्र, दुसऱ्या सेटमध्ये तिने कामगिरी उंचावताना युआनला संधी न देता विजय साकारला. ‘‘पहिल्या फेरीचा अडथळा पार केला याचा आनंद आहे. पण, माझा खेळ परिपूर्ण नव्हता. सर्वकाही व्यवस्थित नव्हते. त्यामुळेच विजयासाठी संघर्ष करावा लागला,’’ असे श्वीऑटेक सामन्यानंतर म्हणाली.
श्वीऑटेकप्रमाणे कोको गॉफलाही काही अडचणींचा सामना करावा लागला. पण, कोकोने त्यातून आपला मार्ग निवडला. कोकोने कामिला रखिमोवा हिला ६-२, ६-३ असे पराभूत केले. श्वीऑटेकप्रमाणे कोको गॉफ देखील या स्पर्धेत उपांत्य फेरीच्या पुढे जाऊ शकलेली नाही. यापूर्वी २०२० मध्ये विजेतेपद मिळविणाऱ्या सोफिया केनिनला त्यानंतर सलग पाचव्यांदा पहिल्या फेरीत आव्हान गमवावे लागले. अमेरिकेच्या पेटन स्टिअर्नने अगदी सहज सोफियाचे आव्हान ६-३, ६-२ असे परतवून लावले. तर, जेसिका पेगुलाने अनास्तासिया झाकोरोवाला ६-२, ६-१ असे नमविले.
पुरुष एकेरीत २५वे ग्रँडस्लॅम जेतेपद मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या जोकोविचने स्पेनच्या पेड्रो मार्टिनेझला ६-३, ६-२, ६-२ असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. हा विजय जोकोविचचा ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेतील १००वा विजय ठरला. जोकोविचच्या अनुभवासमोर या लढतीत मार्टिनेझचा निभाव लागला नाही. अन्य लढतीत, स्टॅन वावरिंकाने लॅस्लो जेरेवर ५-७, ६-३, ६-४, ७-६ (४) असा विजय मिळवून ग्रँड स्लॅममधील आपल्या निरोप समारंभाच्या हंगामाची सुरुवात केली. २०१४ मध्ये येथे विजेत्या असलेल्या वावरिंकाने गेल्याच महिन्यात ऑस्ट्रेलियन स्पर्धा आपली अखेरची असल्याची घोषणा केली होती. अॅलेक्स डी मिनाऊरने मॅकेंझी मॅकडॉनल्डचा ६-२, ६-२, ६-३ असा पराभव केला. तर, डॅनिल मेदवेदेवने जेस्पर डे जोंगला ७-५, ६-२, ७-६ (७-२) असे नमविले.
