वृत्तसंस्था, मेलबर्न

वाढत्या वयाचे आव्हान विसरून ३८व्या वर्षी ऑस्ट्रेलिया खुल्या स्पर्धेत खेळणाऱ्या नोव्हाक जोकिवचने शनिवारी विक्रमी घोडदौड कायम राखली. जोकोविचने चौथी फेरी गाठताना बोटिक वॅन डे झँडशुल्पचा ६-३, ६-४, ७-६ (७-४) असा पराभव केला. ग्रँडस्लॅम कारकीर्दीमधील जोकोविचचा हा ४००वा, तर ऑस्ट्रेलिया स्पर्धेतील १०२ वा विजय ठरला.

एकेरीमध्ये ४०० विजय मिळविणारा जोकोविच एकमेव टेनिसपटू ठरला असून, ऑस्ट्रेलियन स्पर्धेत सर्वाधिक सामने जिंकण्याच्या रॉजर फेडररच्या विक्रमाशीही त्याने बरोबरी केली आहे. जोकोविचने ऑस्ट्रेलियन स्पर्धा सर्वाधिक दहा वेळा जिंकली आहे. या वेळी तो २५व्या ग्रँडस्लॅम विजेतेपदासाठी खेळत आहे. ही कामगिरी जोकोविचकडून झाल्यास, तो टेनिस इतिहासातील सर्वकालीन सर्वाधिक यशस्वी टेनिसपटू ठरेल.

झँडशुल्पविरुद्धच्या सामन्यात सुरुवातीपासूनच जोकोविचचे वर्चस्व होते आणि तिसऱ्या सेटमधील काही क्षण वगळता त्याला कोणतीही अडचण आली नाही. तिसऱ्या गेममध्ये तो अडखळून कोर्टवर पडला आणि नंतर १२व्या गेममध्ये त्याला दोन सेट पॉइंट्सचा सामना करावा लागला. हे दोन क्षण वगळता जोकोविचचा खेळ त्याच्या लौकिकाला साजेसा असाच झाला.

‘‘ऑस्ट्रेलियातील उष्मा वाढत असताना मला रात्रीचा सामना खेळावा लागला हे खूप चांगले झाले. या वेळी शरीर चांगले साथ देत आहे. त्यामुळे या सामन्यात कोर्टवर पडताना स्वतःला सावरले. अन्यथा परिस्थिती बिकट झाली असती. गेल्या वर्षी चारही ग्रँडस्लॅम स्पर्धांत उपांत्य फेरीत आव्हान गमवावे लागले होते. त्यामुळे यंदा चांगली कामगिरी होत असली, तरी फारसा हुरळून जाणार नाही,’’ असे जोकोविच म्हणाला.

अनोखी कामगिरी…

जोकोविचने तीन वेगवेगळ्या प्रकारच्या कोर्टवर शंभर किंवा त्याहून अधिक विजय मिळविण्याचा अनोखा विक्रम केला आहे. अशी कामगिरी करणारा तो एकमेव टेनिसपटू आहे. जोकोविचने गवतच्या कोर्टवर होणाऱ्या विम्बल्डनमध्ये १०२ विजय, लाल मातीच्या कोर्टवरील फ्रेंच स्पर्धेत १०१ विजय मिळवले आहेत. यंदा ऑस्ट्रेलियन स्पर्धेत पहिल्या फेरीचा अडथळा पार करताना जोकोविचने हार्ड कोर्टवर १०० विजय पूर्ण केले होते.