Novak Djokovic US Open Upset Exit 2026: दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोव्हिचला २०२६ यूएस ओपनच्या पहिल्याच फेरीत धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला. आर्थर अॅशे स्टेडियमवर अर्जेंटिनाच्या मारियानो नवोनेने जोकोव्हिचचा तब्बल पाच सेटच्या रंगलेल्या सामन्यात पराभव केला. पहिल्याच फेरीतील पराभवामुळे जोकोव्हिचला स्पर्धेबाहेर व्हावं लागलं. या पराभवानंतर जोकोव्हिच मैदानातच रडताना दिसला. ज्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
दोन सेटमध्ये १-२ अशी आघाडी घेतल्यानंतर जोकोव्हिचला पुढील दोन्ही सेट गमवावे लागले. ३९ वर्षीय सर्बियन खेळाडूचा ७-६(५), ५-७, ४-६, ६-२, ६-१ असा पराभव झाला. न्यूयॉर्कमध्ये चार वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या जोकोव्हिचसाठी हा पराभव मोठा धक्का मानला जात आहे. या पराभवासह जोकोव्हिचची ग्रँडस्लॅम स्पर्धांमधील पहिल्या फेरीत विजय मिळवण्याची तब्बल २० वर्षांची मालिका संपुष्टात आली. नवोनेविरुद्धच्या सामन्यापूर्वी जोकोव्हिचने आपल्या ८२ ग्रँडस्लॅम पहिल्या फेरीतील सामन्यांपैकी तब्बल ८० सामने जिंकले होते. त्याचा पहिल्या फेरीतील अखेरचा पराभव २००६च्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पॉल गोल्डस्टीनविरुद्ध झाला होता.
सामन्याच्या निर्णायक पाचव्या सेटमध्ये जोकोव्हिच भावूक झालेला दिसला आणि त्याच्या डोळ्यांत अश्रू तरळले. विक्रमी २५व्या ग्रँडस्लॅम विजेतेपदाचं स्वप्न पाहणाऱ्या जोकोव्हिचला या पराभवामुळे मोठा धक्का बसला आहे. सामन्याच्या सुरुवातीपासूनच जोकोव्हिचला शारीरिक त्रास होत असल्याचं स्पष्ट दिसत होतं. खराब हवामानामुळे स्टेडियमचं छत बंद करण्यापूर्वी ३९ वर्षीय जोकोव्हिच वारंवार डोक्यावर बर्फाची पिशवी ठेवत होता. न्यूयॉर्कमधील दमट वातावरणामुळे तो अस्वस्थ दिसत होता. छत बंद केल्यानंतर त्याने एअर कंडिशनिंग सुरू करता येईल का, अशी विनंतीही अधिकाऱ्यांकडे केली.
तिसऱ्या सेटमध्ये त्याचा त्रास आणखी वाढला. सहाव्या गेमदरम्यान जोकोव्हिचने अनेक वेळा उलटी केली. त्यानंतर काही वेळ तो कोर्टच्या मागच्या बाजूला वाकून उभा राहिला आणि मग पुन्हा खेळ सुरू केला. दरम्यान, स्पर्धेच्या फिजिओने त्याला काही गोळ्या दिल्या, तर कोर्टच्या बाजूला असलेल्या त्याच्या टीमने त्याला ड्रिंक्स दिले. तोपर्यंत सामना चौथ्या तासाकडे वाटचाल करत होता आणि जोकोव्हिचच्या शारीरिक अडचणी अधिकच स्पष्ट होत होत्या.
तरीही जोकोव्हिचने कसाबसा आपला खेळ सावरत सामन्यात जोरदार पुनरागमन केलं. अनेक चुका झालेल्या टायब्रेकमध्ये पहिला सेट गमावल्यानंतर त्याने दुसऱ्या सेटमध्ये ७-५ असा विजय मिळवत दमदार कमबॅक केला. त्यानंतर तिसरा सेटही ६-४ असा जिंकला. शारीरिक त्रास होत असतानाही जोकोव्हिच विजयापासून अवघ्या एका सेटच्या अंतरावर पोहोचला होता.
मात्र, अर्जेंटिनाच्या नवोनेने जोकोव्हिचला पूर्णपणे पुनरागमन करू दिलं नाही. चौथ्या सेटमध्ये त्याने पुन्हा सामन्यावर नियंत्रण मिळवत ६-२ असा सेट जिंकला. त्यानंतर निर्णायक पाचव्या सेटमध्येही त्याने वर्चस्व कायम ठेवलं. त्यामुळे जोकोव्हिचसमोर सामना वाचवण्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत झुंज देण्याची वेळ आली.
निर्णायक पाचवा सेट जोकोव्हिचसाठी अधिकाधिक कठीण होत गेला. नवोनेने आघाडी वाढवत ४-१ अशी स्थिती केल्यानंतर सर्बियन खेळाडू पूर्णपणे थकलेला दिसत होता. अर्जेंटिनाच्या खेळाडूच्या आक्रमकतेशी जुळवून घेण्यासाठी त्याला संघर्ष करावा लागत होता आणि पुनरागमनाच्या वेळी त्याच्याकडे असलेली ऊर्जा आता पूर्णपणे संपल्याचं दिसत होतं. त्यानंतर सामन्यातील सर्वात भावूक क्षण पाहायला मिळाला. निर्णायक सेटमध्ये कोर्टवरच जोकोव्हिचच्या डोळ्यांत अश्रू आले. सामना हातातून निसटत असल्याचं दिसत असताना तो स्पष्टपणे भावूक आणि व्यथित झालेला दिसला.
तब्बल काही तास उष्णता, डिहायड्रेशन, आजारपण आणि दमछाक करणाऱ्या प्रतिस्पर्ध्याशी झुंज दिल्यानंतर जोकोव्हिचच्या डोळ्यांत अश्रू आले. प्रेक्षकांमध्ये उपस्थित असलेली त्याची पत्नी जेलेनाही हे पाहून भावूक आणि अस्वस्थ झालेली दिसत होती. दरम्यान, जोकोव्हिचने सामन्यात पुन्हा एकदा पुनरागमन करण्यासाठी अखेरपर्यंत प्रयत्न केले, पण तो अपयशी ठरला.
