वृत्तसंस्था, मेलबर्न : टेनिस इतिहासातील सर्वकालीन सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक अशी ख्याती असलेला नोव्हाक जोकोविच आणखी एका विक्रमी जेतेपदाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे. जोकोविचने शुक्रवारी झालेल्या लढतीत गतविजेत्या यानिक सिन्नेरला पाच सेटमध्ये पराभूत करताना ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. त्यामुळे प्रथितयश कारकीर्दीतील २५व्या ग्रँडस्लॅम जेतेपदापासून तो केवळ एक विजय दूर असून रविवारी होणार्‍या अंतिम फेरीत त्याची स्पेनच्या कार्लोस अल्कराझशी गाठ पडेल.

पुरुष एकेरीतील उपांत्य फेरीच्या दोनही लढत अत्यंत चुरशीच्या झाल्या. एकीकडे अल्कराझने तब्बल ५ तास २७ मिनिटांच्या लढतीत जर्मनीच्या ॲलेक्झांडर झ्वेरेवचे आव्हान ६-४, ७-६ (७-४), ६-७ (३-७), ६-७ (४-७), ७-५ असे परवतून लावले. त्यामुळे तो प्रथमच ऑस्ट्रेलियन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला. दुसरीकडे, जोकोविचला सिन्नेरविरुद्ध विजयासाठी ४ तास आणि ९ मिनिटे खेळावे लागले. जोकोविचने दोन वेळा पिछाडीवरून पुनरागमन करताना लढतीत बाजी मारली. त्याने ही लढत ३-६, ६-३, ४-६, ६-४, ६-४ अशी जिंकली.

जोकोविचचा विजय विशेष ठरला. पुरुष एकेरीत सर्वाधिक २४ ग्रँडस्लॅम जेतेपदांचा मानकरी असलेल्या जोकोविचला गेल्या काही वर्षांत अखेरच्या फेर्‍यांमध्ये संघर्ष करावा लागला आहे. सिन्नेर आणि अल्कराझ या नव्या दमाच्या खेळाडूंनी त्याला सातत्याने अडचणीत टाकले आहे. यंदाच्या स्पर्धेदरम्यान जोकोविचला याबाबत विचारण्यातही आले, परंतु ही बाब त्याला फारशी आवडली नव्हती. ‘‘मी कोणाचाही पाठलाग वैगरे करत नाही. मला स्वत:चा इतिहास रचायचा आहे,’’ असे जोकोविच पत्रकार परिषदेत म्हणाला होता. आता या ऐतिहासिक कामगिरीची जोकोविचला रविवारी संधी मिळेल.

अल्कराझला पराभूत करण्यात यश आल्यास टेनिसमध्ये पुरुष किंवा महिला एकेरीत २५ ग्रँडस्लॅम जेतेपदे मिळवणारा तो पहिला खेळाडू ठरेल. यंदाच्या स्पर्धेत जोकोविचला नशीबाची साथ लाभली आहे. उपउपांत्यपूर्व आणि उपांत्यपूर्व फेरीत प्रतिस्पध्र्याच्या माघारीमुळे जोकोविचला पुढेचाल मिळाली होती. मात्र, सिन्नेरविरुद्ध त्याला अशी कोणतीही मदत मिळाली नाही. त्याने लौकिकाला साजेसा झुंजार खेळ करताना दुसर्‍या मानांकित सिन्नेरला पराभूत केले. उपांत्य फेरीत दोन्ही खेळाडूंचा खेळ सदोष होता. मात्र, जोकोविचने कमी चुका केल्या आणि विजय मिळवला. यावेळी त्याला प्रेक्षकांचीही साथ मिळाली.

ऐतिहासिक झुंज

अल्कराझ आणि झ्वेरेव यांच्यातील लढत ऐतिहासिक ठरली. अल्कराझने तब्बल ५ तास आणि २७ मिनिटे चाललेल्या या लढतीत विजय मिळवला. ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेच्या इतिहासात ही सर्वांत दीर्घकाळ चाललेली उपांत्य लढत ठरली. यापूर्वी २००९ मध्ये राफेल नदाल आणि फर्नांडो व्हेर्डास्को यांच्यातील अविस्मरणीय लढत ५ तास आणि १४ मिनिटे चालली होती. अल्कराझ-झ्वेरेव लढतीत वादही झाला. तिसर्‍या सेटच्या नवव्या गेममध्ये अल्कराझच्या पायाचे स्नायू ताणले गेले. यावेळी त्याने तीन मिनिटांची वैद्यकीय विश्रांती मागून घेतली. परंतु ही बाब झ्वेरेवला फारशी पटली नाही. त्याचा पंचांशी वाद झाला.