भारतीय संघातील मधल्या फळीची भिस्त खांद्यावर घेणारा आणि ती जबाबदारी लीलया पेलणारा फलंदाज म्हणून चेतेश्वर पुजाराने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. पुजारा श्रीलंकेविरुद्धच्या आगामी सामन्यात वैयक्तिक कारकीर्दीतील ५० वा कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. त्याच्या आतापर्यंतच्या या प्रवासात सौराष्ट्र रणजी क्रिकेटर आणि त्याचे वडील अरविंद पुजारा यांचे मोठे योगदान आहे. क्रिकेटच्या आतापर्यंतच्या प्रवासातील वडिलांच्या योगदानाबद्दल पुजारा म्हणाला की, वडील हे माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ आहेतच. पण त्याचबरोबर ते माझे टीकाकार आहेत. ते अनेकदा माझ्या खेळावर टीका करायचे. ते पूर्वी फारच कठोर होते. पण सध्याच्या घडीला त्यांच्या स्वभावात अतुलनिय बदल झालाय. आमच्या दोघांमध्ये एखाद्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा होते. त्यातून आम्ही योग्य निष्कर्षापर्यंत पोहोचतो. या सर्वांमुळे मी खूप आनंदी आहे.

याशिवाय पुजारा म्हणाला की, क्रिकेटच्या मैदानातील आतापर्यंतचा प्रवास खास होता. भारताकडून ५० वा कसोटी सामना खेळणे अभिमानास्पद आहे. आतापर्यंत अनेक चढ-उतार पाहिले. पण सध्याच्या घडीला चांगल्या प्रकारे खेळत असून, आगामी सामन्यातही सातत्यपूर्ण खेळी करण्यास प्रयत्नशील असेन. यावेळी त्याने दुखापतसुद्धा आपल्या कारकिर्दीतील सर्वात मोठे आव्हान असल्याचे सांगितले. तो म्हणाला की, गुडघ्याच्या दुखापतीमुळे मला तब्बल सहा महिने संघाबाहेर राहावे लागले. हा काळ माझ्यासाठी सर्वात कठीण होता. जेव्हा तुम्ही दुखापतीतून पुन्हा मैदानात उतरता त्यावेळी चांगली खेळी करु शकेन किंवा नाही याचा दबाव असतो. सात वर्षांच्या कारकिर्दीत पुजाराने भारताकडून ४९ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने ५२.१८ च्या सरासरीने ३९६६ धावा केल्या आहेत. त्यामध्ये १२ शतकांचा समावेश आहे. पहिल्या कसोटीतही त्याने लक्षवेधी शतकी खेळी केली होती.