ऋषिकेश बामणे

मुंबई : टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरल्यामुळे कारकीर्दीतील एक स्वप्न साकार झाले आहे. परंतु आता ऐतिहासिक ऑलिम्पिक पदक जिंकून देशाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी सर्वस्व पणाला लावेन, अशी प्रतिक्रिया भारताची उदयोन्मुख कलात्मक जिम्नॅस्टिक्सपटू प्रणती नायकने व्यक्त केली.

पश्चिम बंगालच्या २६ वर्षीय प्रणतीने दोन आठवडय़ांपूर्वीच आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत स्थाननिश्चिती केली. ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारी दीपा कर्माकरनंतरची ती दुसरीच जिम्नॅस्टिक्सपटू ठरणार आहे. २०१९च्या आशियाई जिम्नॅस्टिक्स अजिंक्यपद स्पर्धेत व्हॉल्ट प्रकारात कांस्यपदक जिंकून प्रकाशझोतात येणाऱ्या प्रणतीने आता जिम्नॅस्टिक्सच्या बळावर कुटुंबीयांची स्वप्ने पूर्ण करण्याचे लक्ष्यही समोर ठेवले आहे. ऑलिम्पिकची तयारी आणि कारकीर्दीतील आव्हानांबाबत प्रणतीशी केलेली ही खास बातचीत-

’ ऑलिम्पिक पात्रतेचे स्वप्न साकार झाल्यानंतर तुझ्या भावना काय होत्या?

चीन येथे २९ मेपासून खेळवण्यात येणारी कलात्मक जिम्नॅस्टिक्सची पात्रता स्पर्धा करोनामुळे चार आठवडय़ांपूर्वीच रद्द करण्यात आली. त्यामुळे माझ्यासह प्रशिक्षकांनाही ऑलिम्पिक पात्रतेबाबत चिंता वाटत होती. मात्र आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स महासंघाने ऑलिम्पिक पात्रतेसाठी अखेरच्या स्पर्धेचा आढावा घेण्याचे ठरवले. २०२० मध्ये एकही स्पर्धा झाली नव्हती. मात्र २०१९च्या मंगोलिया येथे झालेल्या आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक मला तारणारे ठरले. त्यामुळे आशियातील खेळाडूंसाठी राखीव असलेल्या स्थानांद्वारे माझे ऑलिम्पिकमधील स्थान निश्चित झाले. त्याक्षणी मला अश्रू अनावर झाले. कोणत्याही क्रीडापटूचे त्याच्या खेळातील सर्वात प्रतिष्ठित स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न असते. माझे पात्रतेचे स्वप्न पूर्ण झाले असले, तरी आता भारतासाठी जिम्नॅस्टिक्समधील पहिलेवहिले ऑलिम्पिक पदक जिंकण्यासाठी मी अधिक मेहनत करत आहे.

’ तुझ्या आतापर्यंतच्या कारकीर्दीत पालक आणि प्रशिक्षकांनी कशा प्रकारे भूमिका बजावली?

निश्चितच पालक आणि प्रशिक्षकांच्या पाठिंब्याशिवाय मी इथवर मजल मारू शकली नसती. २०१७ मध्ये निवृत्त होण्यापूर्वी माझे वडील बसचालक म्हणून कार्यरत होते, तर आई गृहिणी आहे. अन्य दोन बहिणींनाही क्रीडा क्षेत्रात फारसा रस नव्हता. त्यामुळे मी जेव्हा वयाच्या १०व्या वर्षी जिम्नॅस्टिक्सची निवड केली, तेव्हा त्यांनी चिंता व्यक्त केली. परंतु शाळेच्या प्रशिक्षकांनी त्यांची समजूत काढली. मग उत्तम दर्जाच्या प्रशिक्षणासाठी मला मिदनापूर येथून कोलकाताला स्थायिक व्हावे लागले. मिनारा बेगम आणि लखन शर्मा यांच्या प्रशिक्षणाखाली माझी कारकीर्द बहरली. त्याशिवाय कोलकाताच्या भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साइ) मला वेळोवेळी साहाय्य केले.

’ टाळेबंदीमुळे गेल्या वर्षभरापासून तू स्वत:च्या मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्तीकडे कसे लक्ष केंद्रित केले?

करोनाचा फटका सर्वच क्रीडा प्रकारांना बसला. त्यामुळे मलाही गेल्या वर्षांपासून कोणत्याही स्पर्धेत सहभागी होता आलेले नाही. टाळेबंदीदरम्यान मी घरीच व्यायाम करण्यावर भर दिला. प्रशिक्षकांनी यादरम्यान ऑनलाइन मार्गदर्शन केल्यामुळे माझा खेळाशी संबंध टिकून राहिला. त्यांनी माझे मानसिकदृष्टय़ा खच्चीकरण होणार नाही, याचीही काळजी घेतली. आतादेखील मी घरातच सराव करून शारीरिक तंदुरुस्तीसुद्धा जपत आहे.

’ देशातील जिम्नॅस्टिक्सच्या सद्य:स्थितीविषयी तुझे काय मत आहे?

दीपा कर्माकरमुळे जिम्नॅस्टिक्सला भारतात वेगळी ओळख मिळाली. परंतु देशाच्या खेडय़ापाडय़ात जिम्नॅस्टिक्सचा प्रसार होणे गरजेचे आहे, असे मला वाटते. युवा पिढीतील अनेकांना जिम्नॅस्टिक्सची आवड आहे. मात्र खेळाविषयी योग्य वेळी अचूक माहिती आणि प्रशिक्षण न मिळाल्यामुळे त्यांची वाढ खुंटते. खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धामध्ये जिम्नॅस्टिक्सचा समावेश झाल्यामुळे भविष्यात आपल्याला अनेक ऑलिम्पिक पदकविजेते मिळतील. त्यामुळे सध्या भारतामध्ये जिम्नॅस्टिक्स प्रगतीचे शिखर हळूहळू सर करत आहे. आता ऑलिम्पिकमध्ये माझ्या कामगिरीद्वारे युवा मुलींना त्यांच्या आवडीच्या क्षेत्राकडे वळण्यासाठी प्रेरित करण्याचे माझे ध्येय आहे.

प्रणती नायक, भारताची जिम्नॅस्टिक्सपटू