संदीप कदम

मुंबई : गेल्या काही वर्षांत अनेक मुली कुटुंबाकडून मिळणाऱ्या प्रोत्साहनामुळे क्रिकेट खेळण्यात रस घेत आहेत. त्यामुळे भारतात क्रिकेट खेळणाऱ्या मुलींच्या संख्येत वाढ होईल, असे मत एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० प्रकारात लक्षवेधी फलंदाजी करणारी भारताची सलामीवीर स्मृती मानधनाने व्यक्त केले. महिलांच्या एकदिवसीय क्रमवारीत आठव्या आणि ट्वेन्टी-२० क्रमवारीत चौथ्या स्थानी असलेल्या मानधनाने भारतीय क्रिकेटच्या विकासाचे श्रेय माजी क्रिकेटपटूंना दिले आहे.

‘‘ गेल्या पाच ते सहा वर्षांत महिला क्रिकेटमध्ये सुधारणा झालेली पाहायला मिळत आहे. आम्ही बऱ्याच काळापासून क्रिकेट खेळत आहोत आणि माजी क्रिकेटपटूंनीही या खेळाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यामुळे महिला क्रिकेट संघाची कामगिरी उंचावते आहे. ही तर फक्त सुरुवात आहे, भारतीय महिला क्रिकेटचे भविष्य उज्ज्वल आहे.’’

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) गौरवलेल्या वर्षांतील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूच्या पुरस्काराबाबत मानधना म्हणाली, ‘‘मी लहान असताना काही ध्येये निश्चित केली होती. त्यापैकी भारतासाठी चांगले क्रिकेट खेळणे आणि पुरस्कार जिंकणे हे होते. त्यामुळे हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्यानंतर मला अतिशय आनंद झाला. यापुढेही असे यश मिळवत राहीन.’’

चित्रपट पाहण्याची आवड!

‘‘मला चित्रपट पाहण्याची आवड आहे आणि करोना प्रादुर्भावानंतर पुन्हा एकदा चित्रपटगृह सर्वसामान्यांसाठी खुले होणे ही आनंदाची बाब आहे. क्रिकेटमधून मला सवड मिळाली तर, बाहेर जाऊन चित्रपट पाहण्यास माझी पसंती असते. यासह मी ‘ओटीटी’ व्यासपीठावरही चित्रपट पाहते,’’ असे स्मृती म्हणाली.