NZ beat AFG by 5 Wickets in T20 WC 2026: न्यूझीलंड संघाने टी-२० विश्वचषक मोहिमेची विजयाने सुरूवात केली आहे. न्यूझीलंडने अफगाणिस्तानचा ५ विकेट्सने पराभव करत सामना आपल्या नावे केला आहे. न्यूझीलंडचा टी-२० वर्ल्डकपमधील ऐतिहासिक विजय ठरला, कारण न्यूझीलंडने आजवर १८२ धावांचं मोठं लक्ष्य विश्वचषकात आजवर कधीच यशस्वीरित्या गाठलं नव्हतं. अफगाणिस्तानने विजयासाठी १८२ धावांचं लक्ष्य दिलं होतं, जे संघाने १७.५ षटकांत गाठलं.
न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-२० विश्वचषकातील सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियममध्ये खेळवला गेला. या सामन्यात न्यूझीलंडने बाजी मारली. अफगाणिस्तानने गोलंदाजी-फलंदाजी विभागात चांगली कामगिरी केली, पण संघ विजय मात्र मिळवू शकला नाही. न्यूझीलंडने यासह टी-२० विश्वचषक २०२४ मधील पराभवाचा बदला घेतला आहे. त्या सामन्यात अफगाणिस्तानने न्यूझीलंडला फक्त ७५ धावांवर सर्वबाद केलं होतं. पण आता किवी संघाने २०२६च्या विश्वचषकात विजय मिळवत बदला घेतला.
अफगाणिस्तानने दिलेल्या १८२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सेफर्ट व फिलिप्सने शानदार खेळी केली. मुजीबने दुसऱ्या षटकात फिन एलन व रचिन रवींद्र यांना क्लीन बोल्ड केलं. पण फिलिप्स सेफर्टच्या ७४ धावांच्या भागीदारीने संघाला सामन्यात कायम ठेवलं. सेफर्टने ४२ चेंडूत ७ चौकार व ३ षटकारांसह ६ धावांची खेळी केली. तर ग्लेन फिलिप्स २५ चेंडूत ७ चौकार व एका षटकरासह ४२ धावा करत बाद झाला. तर मार्क चॅपमनने २८ धावांचं योगदान दिलं. तर अखेरीस सँटरन व डॅरिल मिचेल यांनी संघाला विजय मिळवून दिला.
अफगाणिस्तानकडून मुजीब उर रहमानने पहिल्या दोन षटकांत सलग २ विकेट्स घेतल्या. याशिवाय अझमतुल्ला ओमरझाई, रशीद खान, मोहम्मद नबी यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतल्या.
अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रहमानुल्ला गुरबाज २७ धावा करत संघाला चांगली सुरूवात करून दिली. गुरबाज झाद्रान फर्ग्युसनच्या एका षटकात झेलबाद झाले. यानंतर गुलबदिन नायबने वादळी खेळी केली. गुलबदिनने ३५ चेंडूत ३ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने ६३ धावा केल्या. तर सदिकउल्ला अटलने २९ धावांचं योगदान दिलं. तर दारविश रसूलीने १३ चेंडूत २० धावा केल्या. तर ओमरझाईने १४ धावा आणि नबीने १० धावांचं योगदान दिलं. यासह अफगाणिस्तानचा संघ २० षटकांत ६ बाद १८२ धावा करण्यात यशस्वी ठरला.
फिरकीसाठी अनुकूल असलेल्या चेपॉकच्या खेळपट्टीवर न्यूझीलंडकडून लॉकी फर्ग्युसनने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तर मॅट हेन्री, जेकब डफी, रचिन रवींद्र यांनी प्रत्येकी १-१ विकेट्स घेतल्या.
