टेलरचे धमाकेदार द्विशतक; न्यूझीलंडचा बांगलादेशवर दणदणीत विजय

१ डाव आणि १२ धावांनी मिळवला विजय

स्फोटक फलंदाज रॉस टेलर याचे द्विशतक आणि वॅग्नर-बोल्ट जोडीचा भेदक मारा याच्या बळावर न्यूझीलंडने बांगलादेशवर १ डाव आणि १२ धावांनी विजय मिळवला. वॅग्नरचे ५ आणि ट्रेंट बोल्टचे ४ बळी यांच्या बळावर बांगलादेशचा दुसरा डाव केवळ २०९ धावांवर आटोपला. या विजयासह न्यूझीलंडने ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. द्विशतकी खेळी करणाऱ्या रॉस टेलरला सामनावीर घोषित करण्यात आले.

पहिल्या डावात २११ धावांवर डाव संपुष्टात आलेल्या बांगलादेशच्या दुसऱ्या डावाची सुरुवातदेखील खराब झाली. चौथ्या दिवशी २३ षटके बाकी असताना बांगलादेशचा संघ पुन्हा फलंदाजीस मैदानावर उतरला. मात्र पहिल्याच षटकात बांगलादेशच्या तमिम इक्बालला तंबूत परतावे लागल्याने त्यांना जोरदार झटका बसला. चौथ्या दिवसाचा खेळ थांबला, तेव्हा बांगलादेश ३ बाद ८० धावांवर खेळत होता. या धावसंख्येवरुन पुढे खेळताना आज १२९ धावांचीच भर घालता आली. मोहम्मदउल्लाहने ६७ तर मोहम्मद मिथुनने ४७ धावा करत काही काळ संघर्ष केला. पण त्यांचे प्रयत्न तोकडे पडले. नील वॅग्नरचे ५ आणि ट्रेंट बोल्टचे ४ बळी यांच्या बळावर बांगलादेशचा दुसरा डाव केवळ २०९ धावांवर आटोपला आणि न्यूझीलंडने बांगलादेशवर १ डाव आणि १२ धावांनी विजय मिळवला.

त्याआधी न्यूझीलंडचे प्रारंभीचे दोन गडी ३८ धावांमध्येच तंबूत परतले होते. पण चौथ्या दिवशी फलंदाजीस उतरलेल्या टेलरला बांगलादेश संघाने २० धावसंख्येवर दोन वेळा झेल सोडून जीवदान दिले. त्याचा पुरेपूर फायदा उठवत टेलरने २१२ चेंडूंमध्ये २०० धावा फटकावल्या.

हेन्री निकोल्सने १०७ धावांची शतकी खेळी करीत टेलरला तोलामोलाची साथ दिली.

तर कर्णधार केन विल्यम्सननेदेखील ७४ धावांची उपयुक्त खेळी करीत संघाला चारशेच्या पल्याड पोहोचवले. न्यूझीलंडने त्यांचा डाव ६ बाद ४३२ धावांवर घोषित केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Nz vs ban ross taylor double ton and neil wagner trent boult pair hand new zealand series win against bangladesh