काही दिवसांपूर्वी इंग्लंडचा आक्रमक खेळाडू बेन स्टोक्सने एकदिवसीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली. त्याच्या या निर्णयामुळे अनेकांना धक्का बसला होता. आता पुन्हा जागतिक क्रिकेटमधील एक प्रमुख खेळाडू निवृत्तीच्या विचारात असल्याचे म्हटले जात आहे. न्यूझीलंडचा प्रमुख गोलंदाज आणि आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या ट्रेंट बोल्टने क्रिकेट मंडळासोबत करार संपवला आहे. न्यूझीलंड क्रिकेट मंडळाने आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

न्यूझीलंड क्रिकेट मंडळाने ३३ वर्षीय ट्रेंट बोल्टला केंद्रीय करारातून मुक्त केले आहे. विशेष म्हणजे करारातून मुक्त करण्यासाठी स्वत: बोल्टने मंडळाकडे अपील केले होते. त्यानंतर मंडळाने हा निर्णय घेतला आहे. ‘मला कुटुंबासोबत अधिकाधिक वेळ घालवायचा आहे. त्यामुळे मला करारातून मुक्त करावे’, अशी मागणी बोल्टने केली होती.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) एकदिवसीय गोलंदाजी क्रमवारीमध्ये ट्रेंट बोल्ट सध्या पहिल्या क्रमांकावर आहे. कारकिर्दीच्या सर्वात चांगल्या स्थितीमध्ये असताना त्याने करारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. बोल्टने आपल्या कसोटी कारकिर्दीत ३१७ बळी घेतले आहेत. तर, एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने आतापर्यंत १६९ गडी बाद केले आहेत. आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेटमध्येही त्याच्या नावावर ६२ बळींची नोंद आहे.

बोल्टने न्यूझीलंड क्रिकेट मंडळाशी करार संपल्याने तो लवकरच निवृत्ती घेऊ शकतो, अशी चर्चा क्रिकेट चाहत्यांमध्ये सुरू आहे. शिवाय, तो आता आपल्या देशासाठी कमी खेळेल आणि फ्रँचायझी क्रिकेटवर लक्ष केंद्रित करेल, अशी अटकळ बांधली जात आहे. सध्या बोल्ट संघासोबत वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. बोल्टने आपल्या निर्णयाबद्दल सांगितले की, ‘देशासाठी क्रिकेट खेळणे हे लहानपणापासूनचे स्वप्न होते. गेल्या १२ वर्षांत मी संघासोबत राहून जे काही मिळवले त्याचा मला अभिमान आहे.’

हेही वाचा – Rudi Koertzen Passes Away: आयसीसीचे माजी पंच रुडी कोर्टझेन यांचे निधन; विरेंद्र सेहवाग झाला भावूक

आपल्या निर्णयाबद्दल तो पुढे म्हणाला, “मी हा निर्णय माझी पत्नी गर्ट आणि आमच्या तीन मुलांचा विचार करून घेतला. कुटुंब माझ्यासाठी नेहमीच सर्वात मोठा प्रेरणास्रोत ठरला आहे. मला अजूनही माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याची खूप इच्छा आहे. मला वाटते माझ्याकडे ते कौशल्यही आहे. आता राष्ट्रीय करार नसल्यामुळे माझ्या निवडीच्या शक्यतांवर परिणाम होईल, या वस्तुस्थितीचीही मला जाणीव आहे.”

इंडियन प्रीमियर लीगमुळे (आयपीएल) भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये ट्रेंट बोल्ट लोकप्रिय आहे. त्याने ७८ आयपीएल सामन्यांत ९२ बळी घेतले आहेत. आयपीएलमध्ये त्याने दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाइट रायडर्स, सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स संघामध्ये आपले योगदान दिले आहे. २०२२ च्या आयपीएल हंगामात तो राजस्थानकडून खेळताना दिसला होता.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nzc has agreed to release odi number one bowler trent boult from his central contract vkk
First published on: 10-08-2022 at 10:40 IST