जवळपास गेल्या दशकभरामध्ये टी ट्वेंटी क्रिकेटला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. २०-२० षटकांच्या या क्रिकेट फॉरमॅटच्या प्रसिद्धीसाठी आणि चाहत्यांच्या मनोरंजानासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) टी ट्वेंटी विश्वचषक खेळवण्यास सुरुवात केली. दर दोन वर्षानंतर टी ट्वेंटी विश्वचषकाचे आयोजन केले जाते. पुढील टी ट्वेंटी विश्वचषक २०२४ मध्ये होणार आहे. या स्पर्धेचे यजमानपद युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि वेस्ट इंडीज यांच्याकडे देण्यात आले आहे. त्यामुळे हे दोन्ही देश संयुक्तपणे टी ट्वेंटी विश्वचषक २०२४ स्पर्धेचे आयोजन करतील. यानिमित्त अमेरिकेला पहिल्यांदाच आयसीसीच्या स्पर्धेचे आयोजन करता येणार आहे. अमेरिकेमध्ये क्रिकेट मैदानांची कमरता आहे. त्यामुळे कॅलिफोर्नियातील ऑकलंड कोलिजियमला महत्त्व प्राप्त झाले आहे. टी ट्वेंटी विश्वचषकासाठी कोलेजियमचा संभाव्य ठिकाण म्हणून विचार केला जात आहे.

टी ट्वेंटी विश्वचषक २०२४ स्पर्धेच्या आयोजनासंबधी आयसीसीच्या अधिकार्‍यांनी नुकतीच कॅलिफोर्नियाला भेट दिली. तिथे यूएसए क्रिकेट अधिकारी आणि आयसीसीच्या अधिकार्‍यांमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यावेळी ऑकलंड कोलिजियम स्टेडियमवर क्रिकेट सामने आयोजित करण्याच्या शक्यतांवरही चर्चा केली. अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये असलेले ऑकलंड कोलेजियम स्टेडियम हे मेजर लीग बेसबॉल स्पर्धेतील ऑकलंड अ‌ॅथलेटिक्स आणि एनएफएलच्या ऑकलंड रेडर्सचे घरगुती मैदान म्हणून प्रसिद्ध आहे.

१९६६ पासून खेळासाठी उपलब्ध असलेल्या या स्टेडियममध्ये आधुनिक अमेरिकन स्टेडियममध्ये आढळणाऱ्या अनेक आलिशान सुविधांचा अभाव आहे. तरी देखील आयसीसीच्या अधिकाऱ्यांना या मैदानाने आकर्षित केलं आहे. उत्तर कॅलिफोर्नियामध्ये असलेले हे मैदान स्थानिक आणि तळागाळातील क्रिकेट खेळाडूंच्या उदयाचे ठिकाण आहे. याशिवाय याची प्रेक्षक क्षमताही क्रिकेटला साजेशी आहे. या मैदानात ६३ हजारांपेक्षा जास्त प्रेक्षक बसण्याची क्षमता आहे. ही क्षमता सध्या युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामध्ये उपलब्ध असलेल्या कोणत्याही क्रिकेट स्टेडियमच्या दुप्पट आहे.

त्यामुळे टी ट्वेंटी विश्वचषक सामने खेळवण्यासाठी या कोलेजियमचा विचार केला जात आहे. या ठिकाणी खेळपट्ट्या कशा तयार करायच्या हे स्पष्ट करण्यासाठी यूएसए क्रिकेट २०२३ च्या अखेरीस काही प्रदर्शनीय सामने आयोजित करण्याचा विचार करत आहे. त्यासाठी परवानगी मिळाल्यास बेसबॉल हंगाम संपल्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये या ठिकाणी प्रदर्शनीय सामने आयोजित होऊ शकतात.

मात्र, स्टेडियमची उपलब्धता ही सर्वात मोठी समस्या ठरू शकते. टी ट्वेंटी विश्वचषक २०२४ आणि बेसबॉलचा हंगाम एकाच वेळी खेळला जाऊ शकतो. याव्यतिरिक्त, क्रिकेट अधिकाऱ्यांना ड्रॉप-इन खेळपट्ट्या उभारण्यासाठी परवानगी मिळणे गरजेचे आहे. कारण हे स्टेडियम केवळ बेसबॉल आणि फुटबॉलच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार बांधले गेले आहे. या सर्व समस्या पाहता तिथे दोन किंवा तीनपेक्षा जास्त क्रिकेट सामने आयोजित करता येणार नाहीत.

याशिवाय, येथील टाइम झोन सामन्यांच्या प्रसारणासाठी चिंतेची बाब ठरू शकते. हे स्टेडियम पॅसिफिक टाइम झोनमध्ये असल्यामुळे भारतासारख्या देशांमध्ये सामन्यांचे थेट प्रक्षेपण करताना काही अडचणी येऊ शकतात. असे असले तरी डबल-हेडर किंवा ट्रिपल-हेडर सामन्यांसाठी ऑकलंड कोलेजियम योग्य ठिकाण ठरू शकते.