टी२० क्रिकेटमध्ये २० षटकात ३०० धावा करण्याचे वेध संघांना लागलेले असताना गुरुवारी झालेल्या दोन वनडे म्हणजे गोगलगायीशी स्पर्धा ठरल्या. कार्डिफ इथे झालेल्या सामन्यात भारताचा डाव ४४ षटकात २३३ धावांतच आटोपला. छोटेखानी लक्ष्य इंग्लंड सहजपणे गाठेल असं वाटत होतं मात्र प्रत्यक्षात जिंकण्यासाठी त्यांना ४५वं षटक उजाडलं. इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूटने नाबाद ९९ धावांची संयमी खेळी करत इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ५. ३०ला सुरू झालेला सामना दीडच्या बेतात संपला. दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिस गाठायचे वेध लागलेले चाकरमानी खरंच जागून हा संथ सामना पाहतील का असा प्रश्न आहे.

यानंतर जगाच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या प्रोव्हिडन्स या कॅरेबियन बेटांवर झालेला मुकाबला खरंच वनडे होता का असा प्रश्न पडला. न्यूझीलंडने टॉस जिंकून गोलंदाजी स्वीकारली. घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजचा डाव ३८ षटकात १४० धावांतच आटोपला. एकीकडे वेस्ट इंडिजचे ताकदवान फलंदाज जगभरात टी२० लीगमध्ये चौकार, षटकारांची लयलूट करताना दिसत आहेत. मायदेशात मात्र त्यांच्या संघाला एकेक धावेसाठी संघर्ष करावा लागल्याचं चित्र आहे.

विशेष म्हणजे न्यूझीलंडला या आव्हानात्मक खेळपट्टीवर हे लक्ष्य गाठण्यासाठी ४० षटकं लागली. यासाठी त्यांनी ५ विकेट्सही गमावल्या. या विजयासह न्यूझीलंडने पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. एकीकडे क्रिकेट अतिशय वेगवान होत असताना ८-९ तास चालणाऱ्या वनडेंना प्रेक्षक मिळतील का? याचीच खात्री वाटत नाही.

टी२०च्या आक्रमणामुळे वनडे क्रिकेटच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे. आयसीसीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत वनडे प्रत्येकी ४० षटकांचे करावे असा प्रस्ताव मांडण्यात आला होता. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने २५ षटकांचे चार असा वनडेचा विचार व्हावा असं म्हटलं होतं. दोन्ही एण्ड्सनी दोन चेंडू वापरण्यात येतात. यामुळे चेंडू जुना होऊन रिव्हर्स स्विंगचा मुद्दा निकाली ठरतो. यामुळे सचिनने हा नियमही बदलावा अशी मागणी केली होती. २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाने भारतात झालेल्या वनडे वर्ल्डकपच्या जेतेपदावर नाव कोरलं होतं. पुढच्या वर्षी दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वेत वनडे वर्ल्डकप होणार आहे.