नवी दिल्ली : ट्वेन्टी-२० लीगच्या लाटेत अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंनी आपले प्राधान्यक्रम बदलले आहेत. इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सने पुढील वर्षीच्या ‘आयपीएल’मधील सहभागाचा निर्णय इंग्लिश हंगामावर अवलंबून असल्याचे स्पष्ट केले आहे.

जागतिक क्रिकेटमधील अग्रगण्य अष्टपैलू खेळाडू म्हणून ख्याती असलेल्या स्टोक्सने आधीच एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली आहे. खेळ आणि जीवन या ताणाचा समन्वय साधता यावा, यासाठी त्याने हा निर्णय घेतल्याचे म्हटले होते.

दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिरातीच्या नव्या ट्वेन्टी-२० लीगमुळे आंतरराष्ट्रीय कार्यक्रमपत्रिकांवर बराचसा ताण आला आहे. यावर मात करण्यासाठी एकदिवसीय क्रिकेट सामने ४० षटकांचे खेळवण्यात यावेत, अशी सूचना स्टोक्सने केली आहे.

एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय हा आव्हानात्मक होता. कारकीर्द अधिक टिकावी, याच हेतूने हा निर्णय घेतल्याचे स्टोक्सने सांगितले.