Premium

१० वर्षांतील अपयशांचे विश्वचषकात दडपण नाही! क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याची ग्वाही…

भारताचा क्रिकेट संघ भक्कम आणि सुस्थितीत आहे, सर्व खेळाडू तंदुरुस्त आहेत, असे सांगताना गेल्या १० वर्षांतील आयसीसी स्पर्धामध्ये आलेल्या अपयशाचे दडपण नाही, असा विश्वास एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने व्यक्त केला.

rohit sharma
रोहित शर्मा

देवेंद्र पांडे, श्रीराम वीरा, एक्स्प्रेस वृत्त

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : भारताचा क्रिकेट संघ भक्कम आणि सुस्थितीत आहे, सर्व खेळाडू तंदुरुस्त आहेत, असे सांगताना गेल्या १० वर्षांतील आयसीसी स्पर्धामध्ये आलेल्या अपयशाचे दडपण नाही, असा विश्वास एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने व्यक्त केला. गुरुवारपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ‘एक्स्प्रेस समूहा’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्याने संघाची तयारी, चाहत्यांच्या अपेक्षा आदीवर सविस्तर भाष्य केले.

२०१३ साली महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स करंडक जिंकल्यानंतर एकाही बहुसंघीय स्पर्धेतील चषकावर नाव कोरणे भारतीय संघाला शक्य झालेले नाही. आता पुन्हा एकदा मायदेशामध्ये विश्वचषकाचे सामने खेळणाऱ्या रोहितच्या संघाकडून चाहत्यांच्या प्रचंड अपेक्षा आहेत. दशकभरातील अपयशाबाबत विचारले असता रोहित म्हणाला, ‘‘आम्ही जिंकू शकलो नाही. ठीक आहे ! मी खूप जास्त आणि ज्यामुळे माझ्या निर्णयक्षमतेवर परिणाम होतील, असे विचार करणारा व्यक्ती नाही. इंग्लंडने आत्ता जिंकायला सुरूवात केली आहे. एवढय़ा वर्षांनी, २०१९मध्ये त्यांनी पहिल्यांदा विश्वचषक जिंकला. सातत्याने जिंकणारा संघ केवळ ऑस्ट्रेलिया आहे. २००७नंतर त्यांनी पुन्हा २०१५चा विश्वचषक जिंकला. दुबईतील टी-२० विश्वचषक जिंकला.’’ मात्र यावेळी विश्वचषक कोण जिंकेल, या प्रश्नावर थेट उत्तर देणे रोहितने टाळले. ‘‘याचे उत्तर माझ्याकडे नाही. मी एवढेच सांगू शकतो की (आपला) संघ उत्तम स्थितीत आहे. सर्वजण तंदुरुस्त आहेत. मी एवढीच अपेक्षा करू शकतो. यापलिकडे काही सांगू शकत नाही.’’

हेही वाचा >>>World Cup 2023: १२ वर्षांनंतर सचिन तेंडुलकर पुन्हा एकदा उचलणार वर्ल्डकप ट्रॉफी, ICCच्या ग्लोबल अ‍ॅम्बेसेडरपदी झाली नियुक्ती

गेल्यावर्षी विराट कोहलीकडून कर्णधारपदाची धुरा घेतल्यानंतर आपली छाप सोडून जाण्याची रोहितला संधी आहे. मात्र आपण अशा पद्धतीने विचार करत नसल्याचे रोहितने स्पष्ट केले. ‘‘आता प्रत्येक वर्षी आयसीसी चषक स्पर्धा होते. तुम्ही जिंकला नाहीत, तर ते अयशस्वी वर्ष ठरते. मात्र या १० महिन्यांत काय चांगले घडले ते लोक विसरून जातात. खरे म्हणजे, भारतीय क्रिकेट संघ म्हणून आम्ही महत्त्वाच्या स्पर्धा जिंकण्याची अपेक्षा करतो. आमचा संघ जगातील सर्वोत्तम संघांपैकी आहे. त्यामुळे हे काहीसे निराश करणे आहे हे नक्की,’’ असे रोहित म्हणाला.

३६ वर्षांच्या रोहितची कर्णधार म्हणून आणि खेळाडू म्हणूनही कदाचित अखेरची विश्वचषक स्पर्धा ठरेल. कारकीर्दीमध्ये कर्णधारपद काहीसे उशीरा आले का, या प्रश्नावर रोहित म्हणाला, की अर्थात तुमचा खेळ बहरत असताना, २६-२७व्या वर्षी (कर्णधारपद) असावे असे वाटते. पण दरवेळी तुम्हाला हवे ते मिळतेच असे नाही. तुम्ही कर्णधारपदाबद्दल बोलत आहात आणि भारतीय संघामध्ये उत्तमोत्तम खेळाडूंची मांदियाळी आहे. अनेक खेळाडू कर्णधार होण्यास पात्र आहेत. माझ्याआधी विराट, त्याच्याआधी एमएस (धोनी) कर्णधार होते. मला माझी वेळ येईपर्यंत वाट पाहिली पाहिजे आणि ते योग्यच आहे. कुणाकुणाची संधी हुकली तुम्हीच बघा.. गौतम गंभीर, विरेंद्र सेहवाग.. हे उत्तम क्रिकेटपटू आहेत. युवराज सिंगने अनेक सामने जिंकून दिले आहेत. तो कधीतरी कर्णधार व्हायला हवा होता, पण झाला नाही. हेच जीवन आहे. मला आता संधी मिळाली आणि त्यासाठी मी आभारी आहे. उलट मला कर्णधारपदाचे अबकडही माहिती नसताना जी जबाबदारी येण्याऐवजी कर्णधाराने काय करावे लागते आणि त्याच्याकडून काय अपेक्षा असतात हे समजल्यावर कर्णधारपद मिळाले. या दृष्टीकोनातून झाले ते योग्यच असल्याचे रोहितने स्पष्ट केले.

हेही वाचा >>>World Cup 2023: ४६ दिवस, ४८ सामने अन् एक चॅम्पियन; भारत १२ वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती करणार? मागील तीन विश्वचषक जिंकले यजमानांनी

दशकभरातील संघाची कामगिरी

गेल्या १० वर्षांत आंतरराष्ट्रीय स्पर्धामधील भारताची कामगिरी हा चिंतेचा विषय ठरला आहे. प्रत्येक स्पर्धेच्या शेवटच्या फेऱ्यांपर्यंत पोहोचण्यात संघ यशस्वी ठरतो, मात्र बाद फेऱ्यांमध्ये स्पर्धेबाहेर फेकला जातो. २०१५मध्ये उपान्त्य फेरीत ऑस्ट्रेलियाने पराभव केला. २०१९मध्ये न्यूझीलंडने उपान्त्य फेरीत भारताला हरविले. २०२१ला यूएई आणि २०२२ला ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धामध्ये अंतिम सामन्यापर्यंत पोहोचण्यात भारतीय संघाला अपयश आले होते.

चाहत्यांच्या काय अपेक्षा असाव्यात, यावर माझे नियंत्रण नाही. भारतात आम्ही विमानतळ, हॉटेल किंवा अन्यत्र कुठेही गेलो तर लोक म्हणतात, ‘वल्र्ड कप जितना है सर’. हे सगळीकडे घडते आहे. याला अंतच नाही.- रोहित शर्मा, कर्णधार, भारतीय क्रिकेट संघ

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Odi cricket team captain rohit sharma expressed confidence about the icc tournament amy

First published on: 04-10-2023 at 03:16 IST
Next Story
अंतिम फेरीसह लवलिनाला ऑलिम्पिक तिकीट