ODI World Cup 2027 Dates Revealed: एकदिवसीय विश्वचषक (ODI WC 2027) पुढील वर्षी होणार आहे. ही आयसीसी (ICC) स्पर्धा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दरम्यान होणार असल्याची आधीच माहिती समोर आली असली, तरी आता स्पर्धेच्या विशिष्ट तारखा जाहीर झाल्या आहेत. आयसीसीने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नसली तरी, लवकरच अधिकृत वेळापत्रक जाहीर होण्याची अपेक्षा आहे. जुलै महिन्यात आयसीसीची वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) होणार असून, त्यात अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या जाण्याची शक्यता आहे.
पुढील वर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाचे यजमानपद दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया भूषवणार आहेत. या मोठ्या स्पर्धेसाठी विविध संघांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. दरम्यान, ही आयसीसी (ICC) स्पर्धा ४ ऑक्टोबर ते २१ नोव्हेंबर या कालावधीत होण्याची शक्यता असल्याचं समोर आलं आहे. ‘ईएसपीएनक्रिकइन्फो’च्या (ESPNcricinfo) वृत्तानुसार, गेल्या मे महिन्यात अहमदाबाद येथे झालेल्या आयसीसीच्या बैठकीत या तारखांबाबत एकमत झाले होते. तसेच, तीन सह-यजमान देश असूनही, बहुतांश सामने दक्षिण आफ्रिकेतील आठ मैदानांवर खेळवले जाण्याची शक्यता असल्याचेही वृत्त आहे.
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२७ दरम्यान एकूण ५४ सामने खेळवले जातील. रिपोर्ट्सनुसार, यापैकी ४१ सामने दक्षिण आफ्रिकेत होणार आहेत. झिम्बाब्वेमध्ये आठ ते दहा आणि नामिबियामध्ये तीन सामने आयोजित करण्याबाबत विचार केला जात आहे. झिम्बाब्वेमधील सामने तीन वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केले जाऊ शकतात. २००३ नंतर दक्षिण आफ्रिकेत आयसीसी विश्वचषकाचे आयोजन होण्याची ही पहिलीच वेळ असेल.
या वनडे विश्वचषकाचे एक उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे यात एकूण १४ संघ सहभागी होणार आहेत. याउलट, २०२३ मध्ये भारतात झालेल्या विश्वचषकात केवळ १० संघांनी सहभाग घेतला होता. संघांची प्रत्येकी सात अशा दोन गटांत विभागणी केली जाईल आणि हे संघ एकमेकांविरुद्ध सामने खेळतील. तसेच, २००३ नंतर पहिल्यांदाच ‘सुपर सिक्स’ फॉरमॅट एकदिवसीय विश्वचषकात परतणार आहे. १४ संघांची प्रत्येकी सात संघांच्या दोन गटांत विभागणी केल्यानंतर, प्रत्येक गटातील अव्वल तीन संघ ‘सुपर-सिक्स’ फेरीत प्रवेश करतील. त्यानंतर, ‘सुपर-सिक्स’ टप्प्यातील अव्वल चार संघ उपांत्य फेरीत पोहोचतील आणि विजेतेपदाचा सामना २१ नोव्हेंबर रोजी होईल.
एकदिवसीय विश्वचषक २०२७ मध्ये कोणते संघ सहभागी होणार?
यजमान देश असलेल्या दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वेने २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी थेट प्रवेश निश्चित केला आहे. याव्यतिरिक्त, आयसीसी (ICC) क्रमवारीत अव्वल स्थानी असलेले आठ संघ थेट पात्र ठरतील. मात्र, सह-यजमान असूनही, नामिबियाला आपलं स्थान निश्चित करण्यासाठी पात्रता फेरी खेळावी लागणार आहे. उर्वरित तीन किंवा चार जागांसाठीही पात्रता स्पर्धेतच संघ निश्चित होतील. दरम्यान, २०२३ मधील पराभव मागे सारून या नवीन फॉरमॅटमध्ये इतिहास घडवण्याचं भारतीय संघाचं ध्येय असेल.
