2027 ODI World Cup Indias Full Schedule: आयसीसीने पुरूषांच्या एकदिवसीय विश्वचषक २०२७ चं वेळापत्रक जाहीर केलं आहे. भारताचे दोन दिग्गज खेळाडू रोहित शर्मा व विराट कोहली या दोघांचा हा अखेरचा विश्वचषक असल्याने चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. रोहित व विराटने टी-२० आणि कसोटीमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर ते दोघे २०२७ चा वनडे वर्ल्डकप खेळणार की नाही, यावरून सातत्याने चर्चा होत असते. यादरम्यान आता विश्वचषकाचं वेळापत्रक जाहीर झालं यामध्ये भारतीय संघाचे सामने कधी, केव्हा होणार हे आपण जाणून घेऊया.

भारतीय संघ स्पर्धेच्या गट टप्प्यात अ गटात आहेत. भारत आणि पाकिस्तानचे संघ एका गटात आहेत. भारत-पाकिस्तानशिवाय अफगाणिस्तान, गतविजेता ऑस्ट्रेलिया संघ व यजमान झिम्बाब्वेचा संघ असणार आहे.

भारताचा विश्वचषक २०२७ मधील पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरूद्ध होणार आहे. म्हणजेच २०२३च्या विश्वचषकाचा अंतिम सामन्यातील संघाच्या सामन्याने स्पर्धेला सुरूवात होईल. हा सामना गुरूवारी ७ ऑक्टोबरला केपटाऊनमध्ये होईल. त्यानंतर स्पर्धेतील हायव्होल्टेज लढत पाकिस्तानविरूद्धचा सामना १० ऑक्टोबरला जोहान्सबर्गमध्ये होईल. त्यानंतर अफगाणिस्तानविरूद्धचा सामना १४ तारखेला त्शवानेमध्ये होणार आहे. चौथा सामना क्वालिफायर-ए विजेत्या संघाशी १७ ऑक्टोबरला तर २४ ऑक्टोबरला झिम्ब्बावेविरूद्ध सामना होईल. भारताचे स्पर्धेतील सर्व सामने दुपारी १.३० वाजता खेळवले जातील.

वनडे वर्ल्डकपचं भारतीय संघाचं संपूर्ण वेळापत्रक

गुरुवार, ७ ऑक्टोबर
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया — केपटाऊन

रविवार, १० ऑक्टोबर
भारत विरुद्ध पाकिस्तान— जोहान्सबर्ग

गुरुवार, १४ ऑक्टोबर
भारत विरुद्ध अफगाणिस्तान— त्शवाने

रविवार, १७ ऑक्टोबर
भारत विरुद्ध क्वालिफायर A— ब्लोमफोंटेन

रविवार, २४ ऑक्टोबर
झिम्बाब्वे विरुद्ध भारत — व्हिक्टोरिया फॉल्स

गट टप्प्यातील सामन्यानंतर सुपर-७ टप्प्यातील लढती २५ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबरदरम्यान होणार आहेत. तर उपांत्य फेरीच्या लढती १७ व १८ नोव्हेंबरला होतील आणि अंतिम सामना २१ नोव्हेंबरला जोहान्सबर्ग येथे होईल.

भारत आणि पाकिस्तान संघांमधील पहिला सामना १९९२ च्या स्पर्धेत झाला होता आणि तेव्हापासून खेळल्या गेलेल्या सर्व आठ सामन्यांत भारतीय संघाने विजय मिळवला आहे. जगातील एकदिवसीय क्रिकेटमधील अव्वल क्रमांकाचा संघ असलेल्या भारताच्या खेळाडूंचा सध्याचा फॉर्म पाहता, २०२७ च्या विश्वचषकातही पाकिस्तानचा पराभव निश्चित असल्याचे दिसते.