BLOG: हॉकीचा पडद्यामागचा नायक : नवीन पट‘नायक’

२०१४ साली जेव्हा देशात सत्तांतर झालं, तेव्हाच नवीन पटनायकांनी या राष्ट्रीय खेळाचं व्हॅल्यूएशन ओळखलं.

odisha cm naveen patnaik is the behind the scenes of hockey success
हॉकीच्या यशामागचे गोलकीपर नवीन पटनायक

सचिन सकुंडे

हा जो फोटोत टीव्हीसमोर माणूस दिसतोय ना, ते आहेत ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक. आता थोडं सविस्तर, आपला राष्ट्रीय खेळ कोणता असं म्हणल्यावर कोणी क्रिकेट असं उत्तर दिलं ना, तर आपण अजिबात चकित वगैरे होत नाही. इतका क्रिकेट हा आपल्या काळजातला विषय झालेला आहे. कारण त्याचं मॅन्युफॅक्चरिंग आणि मार्केटिंगसाठी जेवढा पैसा ओतला जातो ना, तेवढा कुठल्याच खेळात ओतला जात नाही हे सगळ्यांनाच जवळपास माहिती आहे.

आज पुरूष हॉकी टीमनं कांस्यपदक जिंकलं. महिला संघंही या पदकासाठीचा स्पर्धक आहे. पण पैशाशिवाय कुठलाच खेळ उभा राहू शकत नाही. कारण २०१८ साली जेव्हा हा हॉकी खेळ मरणासन्न अवस्थेतून जात होता, सहारा इंडियाने भारतीय हाॅकीला स्पाँसरशिप देण्यापासून माघार घेतली होती, तेव्हा याच नवीन पटनायकांनी महिला आणि हॉकीच्या दोन्ही राष्ट्रीय संघांना पुढील पाच वर्षासाठी १०० करोड रूपये साईन केले होते.

जेव्हा कोणी भारतीय हॉकी संघाला विचारत नव्हतं, तेव्हा पटनायक यांनी या संघाला जवळ केलं होतं. खरंतर खेळ हा पटनायकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. ते स्वतः शाळेत असताना हॉकीचे गोलकीपर होते. भविष्यात हॉकी या खेळाला त्यांना ओडिशाची ओळख बनवायची प्रेरणा तिथूनच निर्माण झाली. आपल्याला हॉकी म्हटलं, की ढोबळमानाने थेट मेजर ध्यानचंद आठवतात. त्यांच्याच काळात भारतीय हॉकीने माईलस्टोन गाठला होता. १९२८,१९३२,१९३६ या तीन सलग ऑलिम्पिक गोल्डवर भारताने नाव कोरले होते. पण मग नंतरच्या काळात माशी कुठे शिंकली?

कारण क्रिकेट या वासहतिक खेळाच्या स्वातंत्र्योत्तर काळातील वाढत्या प्रभावामुळे हॉकी खेळ खूप मागे पडला. आता तर आयपीएलच्या कॉर्पोरेट खेळात हॉकी उर्वरित भारतात फक्त नावापुरतीच उरलीय. १९८०च्या मॉस्को ऑलिम्पिक फायनलनंतर तर हॉकीची लोकप्रियता कमालीची घटली. आपल्या आजूबाजूला बघितलं तर हॉकीपट्टू व्हावं असं आता कोणालाही वाटत नाही. अगदी आपण आज स्टेटस पाडणाऱ्या लोकांनाही हॉकी जास्त कळते असं नाही. कारण परत तेच लोकाश्रय तेव्हाच मिळण्याची शक्यता असते, जेव्हा आपण कुठल्याही गोष्टीला राजाश्रय देऊ.

बचपन का प्यार म्हणणाऱ्या पोराला जर भूपेश बघेल यांच्यासारखा मुख्यमंत्री दर्जाचा माणूस भेटीगाठी देत असेलस तिथं आपण जनतेकडून कुठल्या लोकानुनयाची अपेक्षा ठेवणार आहे? पण नवीन पटनायकांनी या राष्ट्रीय खेळाचं व्हॅल्यूऐशन ओळखलं आणि म्हणूनच आज आपला पुरूषांचा हॉकी संघ कांस्यपदक मिळवू शकला आहे. खरंतर २०१४ साली जेव्हा देशात सत्तांतर झालं त्याचं वर्षी खेळाबददलच्या त्यांच्या भूमिकेत बदल केला.

भारतीय हॉकी संघाला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी विशेष पाठबळ दिले. २०१७ साली हॉकी इंडिया लीगमध्ये कलिंग लान्सर क्लबला ओडिशा सरकारने स्पाँसर केलं. तो क्लब ती स्पर्धा जिंकला. २०१८ साली भुवनेश्वमधील कलिंग स्टेडियममध्ये वर्ल्ड कप पुरूष गटाची फायनल रंगली. वर्ल्डकप स्पर्धेचं यजमानपदंही ओडिशाने भूषवलं.

त्यानंतर फेडरेशन ऑफ हॉकीची सीरीज त्यानंतर ऑलिम्पिक हॉकी क्वालिफायर २०१९ चे सामनेही ओडिशातच रंगले. २०२०चा फेडरेशन ऑफ हॉकीची pro league ही पटनायकांच्या प्रयत्नामुळे पूर्णत्वास गेली. २०१८च्या वर्ल्डकपच्या यशस्वी आयोजनानंतर आता २०२३चा पुरूष हॉकी वर्ल्डकपही ओडिशातच होणार असल्याचं फेडरेशन ऑफ हॉकीनं सांगितलं आहे.

२०२३चे सामने राजधानी भुवनेश्वर आणि सुंदरगढ जिल्ह्यातील रूरकेला येथे होणार आहेत. त्यासाठी रूरकेला येथे पटनायक सरकार भारतातलं सगळ्यात मोठं २०००० आसन क्षमतेचं स्टेडियम बिरसा मुंडा यांच्या नावाने उभं करणार आहे. सुंदरगढमध्ये हॉकीचा प्रसार व्हावा म्हणून इतर काही १७ ठिकाणी सिंथेटिक टर्फचीही निर्मिती केली जाणार आहे. त्यामुळे भविष्यात सुंदरगढमधून हाॅकीचे अनेक खेळाडू टीम इंडियात दाखल झाले तर नवल वाटायला नको.

हॉकी सोबतच रग्बी फुटबॉल खेळांनाही अर्थसहाय्य करण्याचा पटनायकांचा मानस आहे. करोनाच्या आधी आयोजित पहिल्या वहिल्या खेलो इंडिया सामन्यांततर १७६ विद्यापीठांमधील १७ खेळात दहा दिवसात तब्बल ४००० खेळाडू सहभागी झाले होते. २०१९साली पटनायक सरकारने अभिनव बिंद्रासोबत करार करून कलिंग स्टेडियममध्ये नव्या दमच्या खेळाडूंना ट्रेनिंग मिळावं म्हणून महत्वाचं पाऊल उचललं आहे.

पटनायकांच्या गंजम जिल्ह्यातंही सिंथेटीक अॅथलीट ट्रॅक ,मल्टीपर्पज इनडुअर हॉल ,बास्केटबाॅल ,व्हॉलीबॉल कोर्ट, योगा ,मेडिटेशन हॉल त्यांनी निर्माण केले आहेत. त्यांच्या स्वतःच्या हिंजली मतदारसंघातंही त्यांनी ५०० आसनक्षमतेचं स्टेडियम उभारलं आहे. स्पोर्टसाठी नवीन पटनायकांनी अनेक आंतरराष्ट्रीय पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप्संही (पीपीपी) मंजुर केल्या आहेत. नाहीतर आपल्याकडे एकाच नसलेल्या स्टेडियमचं दहा नेते भुमिपूजन करून जातात.

इच्छाशक्ती म्हणून तर फार महत्वाची आहे. नवीन पटनायक ओडिशाची गरीब आणि आपत्तीने पीडीत राज्य ही ओळख पुसू पाहत आहेत. त्यांना ओडिशाला खेळाचं हब बनवायचं आहे. खेळाला राजकीय धोरणांद्वारे इतक्या ठामपणे देशभरात कुठल्या नेत्याने मांडल्याचं ऐकिवात नाही. नेल्सन मंडेलांनी रग्बी खेळाद्वारे ते साधलं होतं

१९८८ला दक्षिण कोरिया, २००८ला चीन आणि २०१६ला ब्राझीलने देखील असं पॉझिटिव्ह नॅरेटिव्ह उभं केलं होतं. राजकारणात खेळभावना असावी पण खेळात राजकारण असू नये या भावनेतूनच पटनायकांनी विरोधकांनाही या योजनांत हाताशी धरलं आहे. विरोधकंही नवीन पटनायकांच्या या खेळाप्रती असणाऱ्या धोरणांवर खूश आहेत. धोरणाला आर्थिकतेची जोडं असणं गरजेचं आहे, नाहीतर धोरण निव्वळ अस्मिताप्रधान ठरते. त्यामुळेच खेलो इंडिया किंवा तत्सम योजना फक्त कागदावर आणून कसे भागेल?

तुर्तास राज्यशकट चालवणाऱ्या महामहीमांनी ट्वीट करत आयत्यावर कोयता मारून निव्वळ श्रेय घेतलं तर लोकं त्यांना पनौती तर म्हणू लागणारच ना…

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Odisha cm naveen patnaik is the behind the scenes of hockey success adn

ताज्या बातम्या