Ollie Robinson Kapil Dev Record England vs Pakistan Test: इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. यामधील पहिल्या कसोटी सामन्याला आज म्हणजेच १९ ऑगस्टपासून सुरूवात झाली आहे. या कसोटी सामन्यात पाकिस्तानची सुरूवात खूपच खराब झाली आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे आणि पाकिस्तानच्या दोन फलंदाजांना माघारी धाडलं. यादरम्यान इंग्लंडच्या ऑली रॉबिन्सनने मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे.

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ऑली रॉबिन्सनने पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी ऐतिहासिक कामगिरी केली. लीड्समधील हेडिंग्ले क्रिकेट ग्राउंडवर सुरू असलेल्या सामन्यात रॉबिन्सनने सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर अझान अवैसला बाद करत इंग्लंडला स्वप्नवत सुरुवात करून दिली. जो रूटने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या कार्यकाळात पूर्णवेळ कर्णधार म्हणून रूटचा हा पहिलाच सामना आहे. त्यानंतर नवीन चेंडूची जबाबदारी रॉबिन्सनकडे आली आणि त्याने पहिल्याच चेंडूवर जादू दाखवली.

रॉबिन्सनने अझान अवैसला पायचीत (LBW) केलं. पाकिस्तानने तातडीने DRSचा आधार घेतला, मात्र रिव्ह्यू पाकिस्तानच्या बाजूने गेला नाही आणि अवैसला पहिल्याच चेंडूवर पॅव्हेलियनमध्ये परतावं लागलं. रॉबिन्सनने न्यूझीलंडविरुद्धच्या मागील मालिकेतील दमदार फॉर्म कायम ठेवत नव्या मालिकेलाही शानदार सुरुवात केली. विशेष म्हणजे, पहिल्याच चेंडूवर विकेट घेण्याच्या या कामगिरीमुळे त्याने भारताचे महान अष्टपैलू कपिल देव यांच्या ४३ वर्षे जुन्या दुर्मिळ विक्रमाची बरोबरी केली.

ऑली रॉबिन्सनची कसोटी सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर विकेट

ऑली रॉबिन्सन हा कसोटी सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर पाकिस्तानी फलंदाजाला बाद करणारा जगातील केवळ दुसरा गोलंदाज ठरला आहे. याआधी हा पराक्रम भारताचे महान अष्टपैलू कपिल देव यांनी केला होता. १९८३ मध्ये जालंधरच्या गांधी स्टेडियमवर झालेल्या कसोटी सामन्यात कपिल देव यांनी मोहसिन खानला पहिल्याच चेंडूवर बाद केलं होतं. आता ४३ वर्षांनंतर रॉबिन्सननेही अशीच कामगिरी करत कपिल देव यांच्या विक्रमाची बरोबरी केली. तर गेल्या ४३ वर्षांत ही अनोखी कामगिरी करणारा रॉबिन्सन हा पहिलाच गोलंदाज ठरला आहे.

दरम्यान, कसोटीच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेण्याची ही इंग्लंडच्या गोलंदाजाची सहावी घटना आहे. विशेष म्हणजे, इंग्लंडच्या भूमीवर खेळताना अशी कामगिरी करणारा रॉबिन्सन हा चौथा इंग्लिश गोलंदाज ठरला आहे. आणखी एक रंजक योगायोग म्हणजे, इंग्लंडविरुद्ध खेळताना आजवर कोणत्याही विदेशी गोलंदाजाने कसोटीच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेतलेली नाही. विशेष म्हणजे, या विक्रमाची पहिली नोंद बरोबर १०० वर्षांपूर्वी हेडिंग्लेमध्येच झाली होती.

तिसऱ्या षटकात रॉबिन्सनने दिवसातील दुसरी विकेट घेत माजी पाकिस्तानी कर्णधार शान मसूदला अवघ्या ५ धावांवर बाद केलं. रॉबिन्सनच्या या दुहेरी धक्क्यामुळे पाकिस्तानची सुरुवातच अडचणीत आली. मात्र, पहिलं सत्र पूर्ण होण्यापूर्वीच पावसामुळे खेळ थांबवावा लागला. त्यामुळे इंग्लंडने मिळवलेली आघाडीची सुरुवात काही काळासाठी थांबली.