संयुक्त गतविजेत्या भारतापुढे ‘फिडे’ ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धेत सोमवारी होणाऱ्या दोन लढतींच्या उपांत्यपूर्व फेरीत युक्रेनचे आव्हान असेल. यंदाही जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात असल्यामुळे बाद फेरीत भारतावर अधिक दडपण असणार आहे.

भारताने या स्पर्धेत अपराजित राहात ‘ब’ गटात सर्वाधिक १६ गुणांसह बाद फेरी गाठली. फ्रान्स आणि स्लोव्हेनिया या दोनच संघांना भारताविरुद्धची लढत बरोबरीत सोडवण्यात यश आले, तर भारताने इजिप्त, स्वीडन, शेनझेन चायना, अझरबैजान, बेलारूस, हंगेरी, मोल्डोव्हा यांना पराभूत केले.

विश्वनाथन आनंदला युक्रेनविरुद्ध लढतीत त्याचा जुना प्रतिस्पर्धी वेस्ली इव्हानचूकला झुंज द्यावी लागू शकेल. महिलांमध्ये कोनेरू हम्पीपुढे लुलिया ओस्माक आणि नतालिया बुक्सा यांच्यापैकी एकीचे आव्हान असेल. मात्र, निहाल सरिन आणि आर. वैशाली या युवा खेळाडूंमुळे भारताचे पारडे जड मानले जात आहे.

युक्रेनच्या संघात ग्रँडमास्टर बुद्धिबळपटूंचा समावेश आहे. मात्र, त्यांची भारतासोबत तुलना करता येणार नाही. त्यामुळे विश्वनाथन आनंदला दिवसाच्या पहिल्या सामन्यात विश्रांती देण्यात येईल असा माझा अंदाज आहे. भारतीय संघाचे उपांत्य आणि अंतिम फेरीकडे लक्ष असेल. तर युक्रेनला उपांत्य फेरीचा अडथळा ओलांडता येणार नाही.

– प्रवीण ठिपसे, माजी बुद्धिबळपटू