Manu Bhaker Parents Video Viral : भारतीय नेमबाज मनू भाकेरने पॅरिसमध्ये ऑलिम्पिकमध्ये दुसऱ्यांदा पदकावर नाव कोरले आहे. रविवारी मनू भाकेरने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूलमध्ये कांस्यपदक जिंकले होते. आज तिने सरबज्योत सिंगसह दुसऱ्यांदा पदक जिंकत इतिहास रचला आहे. वास्तविक, भारतीय नेमबाद मनू भाकेर आणि सरबज्योत सिंग या जोडीने १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक नेमबाजी स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. त्यामुळे मनू भाकेर ऑलिम्पिकमधील १० मीटर एअर पिस्तूलमध्ये दोन कांस्यपदक जिंकणारी स्वतंत्र भारतातील पहिली महिला खेळाडू ठरली आहे.
अशा प्रकारे आपल्या लेकीने एकाच स्पर्धेत दोन पदकं जिंकल्याने मनू भाकेरच्या पालकांच्या आनंदाला पारावार उरला नाही, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. भारतीय स्टार जोडीने दक्षिण कोरियाच्या ली ओन्हो आणि ओह ए जिन यांचा १६-१० अशा मोठ्या फरकाने पराभव केला. भारतासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. यापूर्वी कोणत्याच नेमबाजाने नेमबाजीत दोन पदके जिंकली नव्हती, मात्र मनूने आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. अशाप्रकारे, एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी मनू भाकेर ही स्वातंत्र्यानंतरची पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.
एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकणारी पहिली भारतीय –
पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी एकाच ऑलिम्पिकमध्ये भारताच्या कोणत्याही पुरुष किंवा महिला खेळाडूने २ पदके जिंकलेली नाहीत. याशिवाय २ पदके जिंकणारी ती पहिली भारतीय नेमबाज ठरली. याआधी पॅरिस ऑलम्पिकच्या दुसऱ्या दिवशी मनू भाकरने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूलमध्ये कांस्यपदक पटकावले होते. मनू भाकेर गेल्या २० वर्षांत वैयक्तिक स्पर्धेत ऑलिम्पिक अंतिम फेरीत पोहोचणारी भारताची पहिली महिला नेमबाज ठरली. यापूर्वी भारतीय महिला नेमबाज सुमा शिरूर होती, जिने २००४ मध्ये ग्रीक राजधानीत झालेल्या अथेन्स ऑलिम्पिकमध्ये १० मीटर एअर रायफल प्रकारात अंतिम फेरी गाठली होती.
मनू भाकेरच्या आनंदाला पारावार उरला नाही –
मनू भाकेरचे घर हरियाणातील झज्जर येथे आहे. मनू भाकेरचे कुटुंबीय झज्जरमधील आपल्या घरी या दोन्ही पदकांचे जोरदार सेलिब्रेशन करत आहेत. त्यांच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स सतत कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. मनू भाकेरच्या मेहनतीचे हे फळ असल्याचे सोशल मीडियावरील चाहत्यांचे म्हणणे आहे. विशेषतः ऑलिम्पिकसारख्या मोठ्या स्पर्धेत दोन पदके जिंकणे सोपे नाही, पण मनू भाकेरने ते करून दाखवले. त्याचबरोबर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला आतापर्यंत दोन पदके मिळाली आहेत, दोन्ही पदके मनू भाकेरने जिंकली आहेत.
हेही वाचा – Olympics 2024 : भारताच्या खात्यात दुसरं पदक, नेमबाजीत मनू भाकेर, सरबजोत सिंह जोडीची कमाल
त्याच वेळी, आता भारत दोन कांस्य पदकांसह पदकतालिकेत २५ व्या स्थानावर पोहोचला आहे. याआधी रविवारी मनू भाकेरने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूलमध्ये कांस्यपदक जिंकून इतिहास रचला होता. आता मनू भाकरने सरबज्योत सिंगसह १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक नेमबाजी स्पर्धेत कांस्यपदक पटकावले आहे. सध्या जपान ६ सुवर्ण, २ रौप्य आणि ४ कांस्य पदकांसह अव्वल स्थानावर आहे. यानंतर फ्रान्स ५ सुवर्ण, ८ रौप्य आणि ३ कांस्य पदकांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
© IE Online Media Services (P) Ltd