उपांत्य लढतीत बेल्जियमचा भारतावर ५-२ असा दणदणीत विजय

तब्बल ४१ वर्षांनंतर ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकण्याचे भारतीय पुरुष हॉकी संघाचे स्वप्न मंगळवारी झालेल्या उपांत्य लढतीत विश्वविजेत्या बेल्जियमकडून २-५ अशा फरकाने पराभवामुळे भंगले. परंतु तरीही भारताला गुरुवारी जर्मनीविरुद्धची लढत जिंकून कांस्यपदकानिशी ऑलिम्पिक हॉकीमधील पदकाचा दुष्काळ संपवता येईल.

ऑलिम्पिक हॉकीमध्ये सर्वाधिक गोल नावावर असणारा अ‍ॅलेक्झांडर हेंड्रिक्सने (१९व्या, ४९व्या आणि ५३व्या मिनिटाला) हॅट्ट्रिक नोंदवून बेल्जियमच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. याव्यतिरिक्त लॉइक लुयपर्ट (दुसऱ्या मि.) आणि जॉन-जॉन डोमेन (६०व्या मि.) यांनीसुद्धा गोल केले. मागील ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक विजेत्या बेल्जियमने सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. भारताकडून हरमनप्रीत सिंग (७व्या मि.) आणि मनदीप सिंग (८व्या मि.) यांनी गोल केले.

बेल्जियमने सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा स्वीकारत पहिली पाच मिनिटे सामन्यावर पूर्णत: नियंत्रण मिळवले. दुसऱ्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचे लुयपर्टने उत्तमपणे गोलमध्ये रूपांतरण केले. नंतर दोन मिनिटांतच भारताने दोन गोलची नोंद करीत सामन्याला कलाटणी दिली. सामन्याच्या सातव्या मिनिटाला दोन पेनल्टी कॉर्नर भारताला मिळाले. यापैकी दुसऱ्याचे हरमनप्रीतने दिमाखदार गोलमध्ये रूपांतर करीत यंदाच्या ऑलिम्पिकमधील वैयक्तिक गोलसंख्या पाचपर्यंत नेली. पुढच्याच मिनिटाला अमित रोहिदासने उजवीकडून दिलेल्या क्रॉसच्या बळावर मनदीपने बेल्जियमचा गोलरक्षक व्हिन्सेन्ट व्हॅनाशला चकवून अप्रतिम मैदानी गोल केला आणि भारताला आघाडी मिळवून दिली. पहिल्या सत्रात भारताला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला. परंतु रुपिंदर पाल सिंगचा प्रयत्न व्हॅनाशने हाणून पाडला.

पहिल्या सत्रात पिछाडीवर पडलेल्या बेल्जियमने दुसऱ्या सत्रात अधिक त्वेषाने उतरत भारताच्या बचावफळीवर जोरदार हल्ले केले. बेल्जियमला या सत्रात चार पेनल्टी कॉर्नर मिळाले. यापैकी अखेरच्या पेनल्टीचे हेंड्रिक्सने गोलमध्ये रूपांतर करीत बेल्जियमला बरोबरी साधून दिली. मध्यांतराआधी अखेरच्या मिनिटाला हरमनप्रीतला गोलजाळ्याचा वेध घेण्यात अपयश आले.

तिसऱ्या सत्रात बेल्जियमने पुन्हा भारतीय बचाव भेदण्यासाठी पेनल्टी कॉर्नरद्वारे प्रयत्न केले, पण भारतीय बचावापुढे हे प्रयत्न अयशस्वी ठरले. ३८व्या मिनिटाला पाचव्या पेनल्टी कॉर्नरद्वारे आघाडी घेण्याची भारताची संधी अपयशी ठरली. तिसऱ्या सत्रात दोन्ही संघांना गोल करता आले नाही.

सामन्याचे चौथे सत्र निर्णायक ठरले. बेल्जियमने दर्जाला साजेसा खेळ करीत भारतीय बचाव तीनदा भेदत शानदार विजयावर शिक्कामोर्तब केले. ४९व्या मिनिटाला हेंड्रिक्सने पेनल्टी कॉर्नरचे गोलरूपांतर करीत बेल्जियमला ३-२ अशी आघाडी मिळवून दिली. लागोपाठच्या पेनल्टी कॉर्नरमुळे भारतीय बचावाचे दडपण आणखी वाढले. ५३व्या मिनिटाला हेंड्रिक्सने पेनल्टी स्ट्रोक्सद्वारे वैयक्तिक तिसरा आणि चौथा सांघिक गोल झळकावला.

दोन गोलनी पिछाडीवर पडलेल्या भारताने गोलरक्षक पी. आर. श्रीजेशला हटवून अतिरिक्त खेळाडूसह बेल्जियमला गाठण्याचे प्रयत्न केले. परंतु ही रणनीती भारतावरच उलटली. गोलरक्षकरहित गोलजाळ्यात डोमेनने मैदानी गोल करीत बेल्जियमच्या खात्यावर पाचव्या गोलची भर घातली.

पेनल्टी कॉर्नरच्या रणनीतीत अयशस्वी

भारतीय हॉकी संघाने ऑलिम्पिक इतिहासात आठ सुवर्णपदके जिंकण्याची किमया साधली आहे. यापैकी अखेरचे सुवर्णपदक मॉस्को ऑलिम्पिकमध्ये १९८० मध्ये मिळवले होते. बेल्जिमयने पाचपैकी चार गोल पेनल्टी कॉर्नरद्वारे नोंदवले, हेच भारताच्या पराभवाचे प्रमुख कारण ठरले. भारताच्या बचावफळीने प्रचंड दडपणाखाली खेळ केल्यामुळे बेल्जियमला १४ पेनल्टी कॉर्नर मिळाले. यापैकी चारचे त्यांना गोलमध्ये रूपांतर करता आले. भारताच्या गोलजाळ्यासमोरील अर्धवर्तुळात प्रवेश करून पेनल्टी कॉर्नर मिळवले, ही बेल्जियमची रणनीती यशस्वी ठरली. हेंड्रिक्स आणि लुयपर्ट यांनी यांच्या कसलेल्या हॉकीपटूंनी त्याचे सोने केले. भारतालाही पाच पेनल्टी कॉर्नर मिळाले. परंतु यापैकी फक्त एकाचे गोलमध्ये रूपांतर भारतीय खेळाडूंना करता आले.

प्रदीर्घ कालावधीनंतर ऑलिम्पिक हॉकी स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणे, हे कौतुकास्पद आहे. विजयी मानसिकतेने आम्ही मैदानावर उतरलो होतो. परंतु दुर्दैवाने आम्ही सामना गमावला, हे अपयश पचवणे अतिशय कठीण आहे. परंतु आता किमान देशाला कांस्यपदक जिंकून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

– मनप्रीत सिंग, भारताचा कर्णधार

निराशाजनक! परंतु पराभवाचे आत्मपरीक्षण करण्यासाठी आता वेळ नाही. नैराश्य झटकून पुढील सामन्याकडे पाहावे लागणार आहे. रडत बसण्यापेक्षा अद्याप असलेली कांस्यपदकाची संधी साधणे, हेच सर्वात महत्त्वाचे आहे. – पी. आर. श्रीजेश, भारताचा गोलरक्षक