Olympic Impact : ७१ टक्के पालक मुलांच्या क्रिकेटखेरीज अन्य खेळासाठीही अनुकूल

देशातील क्रीडा क्षेत्रासाठी एक सकारात्मक बातमी ! करिअर करण्यासारखा खेळ म्हणजे फक्त क्रिकेट असं एक समीकरण पक्कं झालं होतं. मात्र, आता…

Olympic Impact 71 percent of parents support their children sports other than cricket gst 97
एका सर्वेक्षणात ७१ टक्के भारतीय सांगितलं आहे की, ते आपल्या मुलांना क्रिकेट व्यतिरिक्त इतर खेळात करिअर करायसाठी निश्चितपणे पाठिंबा देतील. (Photo : Indian Express)

टोकियो ऑलिम्पिक २०२० मधील भारताच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर क्रीडा क्षेत्राकडे पाहण्याच्या भारतीयांच्या दृष्टिकोनात सकारात्मक बदल झाल्याचं दिसून येत आहे. करिअर करण्यासारखा खेळ म्हणजे फक्त क्रिकेट असं एक समीकरण आपल्या देशात बहुतांश लोकांच्या मनात अगदी पक्कं झालं असल्याचं यापूर्वी पर्यंत आपण पण आलो आहोत. मात्र, हेच चित्र आता बदलताना दिसत आहे. भारतीय कुटुंबांच्या लक्षणीय टक्केवारीने असं म्हटलं आहे की, आपल्या मुलांना क्रिकेट व्यक्तिरिक्त इतर खेळांना आपलं करिअर करण्यास ते संपूर्ण पाठिंबा देतील. मंगळवारी प्रकाशित एका सर्वेक्षणाच्या निष्कर्षानुसार, ७१ टक्के भारतीय कुटुंबांनी असं सांगितलं आहे की, जर आपल्या मुलांना किंवा नातवंडांना क्रिकेट व्यतिरिक्त इतर खेळात करिअर करायचं असेल तर ते निश्चितपणे त्यांना पाठिंबा देतील.

५१ टक्के भारतीयांनी फॉलो केलं टोकियो ऑलिम्पिक २०२०

लोकल सर्कल्सच्या सर्वेक्षणात असं लक्षात आलं कि, ५१ टक्के भारतीयांनी यंदाच्या टोकियो ऑलिम्पिक २०२० ला फॉलो केलं आहे. २०१६ मध्ये हे प्रकार २० टक्क्यांपेक्षा देखील कमी होतं. यंदा हे प्रमाण दुपटीने वाढलं आहे. दरम्यान, या सर्वेक्षणातून दोन ठळक गोष्टींबाबतचे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. पहिलं म्हणजे टोकियो ऑलिम्पिक २०२० ला किती टक्के भारतीयांनी पाहिलं किंवा फॉलो केलं? आणि या ऑलिम्पिकमधील भारताच्या जबरदस्त कामगिरीनंतर क्रिकेट व्यतिरिक्त इतर खेळांकडे पाहण्याचा भारतीय कुटुंबांचा दृष्टिकोन कसा आहे? जाणून घेऊया या दोन्ही प्रश्नांची उत्तरं

लोकल सर्कल्सच्या या सर्वेक्षणादरम्यान लोकांना विचारण्यात आलं की, त्यांनी किंवा त्यांच्या कुटुंबातील इतर कोणीही टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये भारतीय खेळाडूंचा समावेश असलेले सामने पाहिले आहेत का? किंवा बारकाईने फॉलो केले आहेत का? या प्रश्नावर ५१ टक्के लोकांनी “हो” असं उत्तर दिलं. ४७ टक्के लोकांनी “नाही” असं सांगितलं. तर २ टक्के लोकांनी कोणतंही मत व्यक्त केलं नाही”, असं लोकल सर्कल्सने सांगितलं आहे. सर्वेक्षण केलेल्या ५१ टक्के कुटुंबांमध्ये किमान एकाने तरी टोकियो ऑलिम्पिक २०२० पाहिलेलं आहे, हे ह्यातून स्पष्ट झालं. “२०१६ च्या तुलनेत ही वाढ लक्षणीय आहे. कारण, लोकल सर्कल्सच्या सर्वेक्षणानुसार २०१६ मध्ये २० टक्क्यांपेक्षा कमी भारतीय हे ऑलिम्पिकमधील भारताच्या कामगिरीकडे लक्ष ठेवून होते.

होय, आम्ही मुलांना पाठिंबा देऊ! भारतीय पालकांच्या दृष्टिकोनात सकारात्मक बदल

दुसरा महत्त्वाचा निष्कर्ष म्हणजे क्रिकेट व्यतिरिक्त अन्य खेळाकडे करिअर म्हणून पाहण्यासंदर्भातला. “जर तुमच्या मुलाला/नातवंडाला क्रिकेटव्यतिरिक्त अन्य कोणत्या खेळात खूप रस असेल तर त्याने ते करिअर म्हणून निवडावं असं तुम्हाला वाटतं का?” असा प्रश्न या सर्वेक्षणात विचारण्यात आला असता ७१ टक्के भारतीय पालकांनी होकारार्थी उत्तर दिल्याचं पाहायला मिळालं आहे. १९ टक्के लोकांनी यावर नाही असं म्हटलं आहे. तर १० टक्के लोकांनी याबाबत आपलं मत व्यक्त केलेलं नाही असं लोकल सर्किल्सने सांगितलं आहे. दरम्यान, हा एक अत्यंत सकारात्मक बदल आहे.

देशात क्रिकेट सोडून अन्य खेळांनाही ऊर्जा

कम्युनिटी प्लॅटफॉर्म लोकल सर्कल्सने केलेल्या आपल्या या देशव्यापी सर्वेक्षणाबाबत सांगताना म्हटलं आहे की, “रौप्यपदक विजेती वेटलिफ्टर मीराबाई चानू, सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि पुरुषांच्या हॉकी संघाच्या ऑलिम्पिकमधील कामगिरीच्या देशव्यापी परिणामांचा मागोवा घेण्याचा आणि अभ्यास करण्याचा या सर्वेक्षणाचा उद्देश होता.” पुढे लोकल सर्कल्सने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे कि, “खरंतर बहुतेक मध्यमवर्गीय पालक आपल्या मुलांनी जर क्रिकेट व्यतिरिक्त अन्य खेळांकडे करिअर म्हणून पाहिलं तर त्यांना पाठिंबा देण्यास नाखूष असतात. कारण त्यांचं असं मत असतं कि हे अन्य खेळ नियमित कमाई आणि दीर्घकालीन आर्थिक स्थिरता देऊ शकत नाहीत. परंतु, टोकियो ऑलिम्पिकने भारतामधील हे चित्र पालटलं आहे. त्यामुळे, देशात क्रिकेट सोडून अन्य खेळांना देखील नवीन आणि ताजी ऊर्जा निर्माण झालेली दिसते,”

लोकल सर्कल्सने सांगितल्याप्रमाणे, या सर्वेक्षणासाठी देशभरातील तब्बल ३०९ जिल्ह्यांतील १८,००० लोकांकडून प्रतिसाद घेण्यात आला आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी ६६ टक्के  पुरुष तर ३४ टक्के महिला होत्या. त्याचप्रमाणे, यापैकी ४२ टक्के लोक टियर १ जिल्ह्यांतील, २९ टक्के  टियर २ तर २९ टक्के लोक टियर ३, ४ आणि ग्रामीण जिल्ह्यांतील होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Olympic impact 71 percent of parents support their children sports other than cricket gst