हॉकीत ऑलिम्पिक पदकाचा दुष्काळ संपेल!

तंदुरुस्त भारतीय हॉकी संघ टोक्यो ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी करेल, असा विश्वास आहे.

भारताचे महान हॉकीपटू धनराज पिल्ले यांना खात्री

पीटीआय, नवी दिल्ली

तंदुरुस्त भारतीय हॉकी संघ टोक्यो ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी करेल, असा विश्वास आहे. त्यामुळे यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये हॉकीतील पदकाचा दुष्काळ नक्कीच संपेल, असा विश्वास भारताचे महान हॉकीपटू धनराज पिल्ले यांनी व्यक्त केला.

पिल्ले यांनी १९९२ ते २००४ या कालावधीत सलग चार वेळा ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले. ते म्हणाले की, ‘‘मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाची तंदुरुस्ती हीच खूप मोठी ताकद असणार आहे. भारतीय संघ यावेळी नक्कीच चांगली कामगिरी करेल, याची मला खात्री आहे. गेल्या पाच वर्षांपासून भारतीय हॉकी संघाची कामगिरी चांगली होत आहे. चॅम्पियन्स करंडक (२०१६, २०१८) तसेच वर्ल्ड हॉकी लीग फायनल्स (२०१५ आणि २०१७) या स्पर्धामध्ये भारताने आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे.’’

भारतीय संघाला प्रत्यक्षपणे शुभेच्छा देता न आल्याने धनराज यांनी मनप्रीत आणि महिला संघाची कर्णधार राणी रामपाल यांना पत्र लिहून दोन्ही संघांना टोक्योमधील दमदार कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ‘‘करोनाच्या नियमांमुळे मला प्रत्यक्षपणे खेळाडूंची भेट घेता आली नाही. त्यामुळे पत्राद्वारे मी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. क्रीडाग्राममध्ये वास्तव्य करताना आहाराकडे विशेष लक्ष द्यावे, असा सल्ला मी त्यांना दिला आहे. प्रत्येक वेळी चांगला संघ मिळूनही भारताला पदकापर्यंत झेप घेता आली नाही. यंदा मात्र त्याच चूका भारतीय संघाने करू नये. अंतिम फेरीपर्यंतचा विचार न करता एकावेळी एकाच सामन्यावर लक्ष केंद्रित करावे,’’ असेही पिल्ले यांनी सांगितले.

हॉकी संघात दोन खेळाडूंचा समावेश

भारतीय पुरुष हॉकी संघात बचावपटू वरुण कुमार आणि मध्यरक्षक सिमरनजित सिंग यांचा तर महिला संघात बचावपटू रीना खोखार आणि अनुभवी मध्यरक्षक नमिता टोप्पो यांचा समावेश करण्यात आला आहे. हॉकी इंडियाने याआधी टोक्यो ऑलिम्पिकसाठी १६ जणांच्या पुरुष आणि महिला संघाची घोषणा केली होती. पण आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या नव्या आचारसंहितेनुसार संघात प्रत्येकी दोन खेळाडूंचा समावेश करण्यात आला. यंदा करोनामुळे ‘आयओसी’ने प्रत्येक संघात दोन अतिरिक्त खेळाडूंचा समावेश करण्यात परवानगी दिली आहे. याआधीच्या ऑलिम्पिकमध्ये राखीव खेळाडूंना संघासोबत प्रवास करता येत होता. एखादा खेळाडू जायबंदी झाला किंवा त्याने माघार घेतली तरच राखीव खेळाडूंना खेळण्याची संधी मिळायची.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Olympic medal drought in hockey will end dhanraj pillay ssh

ताज्या बातम्या