Olympics 2024 Ana Barbosu Gymnastics bronze against Jordan Chiles : भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटला ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक मिळणार की नाही याचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही. ५० किलो वजनी गटात खेळणाऱ्या विनेश फोगटचं स्पर्धेतील अंतिम सामन्यापूर्वी वजन तपासलं तेव्हा ते १०० ग्रॅम अधिक भरल्यामुळे तिला स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आलं होतं. त्यानंतर विनेशने रौप्य पदक मिळावं यासाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडे (सीएएस) याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाली आहे. क्रीडा लवादाने विनेशच्या याचिकेवरील निकाल अद्याप जाहीर केलेला नाही. लवकरच या प्रकरणाचा निकाल जाहीर केला जाईल. सीएएसने शनिवारी रात्री ९.३० वाजेपर्यंत आपला निर्णय जाहीर करण्याची घोषणा केली होती. मात्र हा निकाल आज (रविवार, ११ ऑगस्ट) जाहीर केला जाईल असं सांगण्यात आलं आहे. दरम्यान, सीएएसने विनेश सारख्याच एका प्रकरणात दिलेल्या निकालानंतर विनेश फोगटला रौप्य पदक मिळण्याच्या आशा बळावल्या आहेत. सीएएसने रोमानियाची जिम्नॅस्ट अॅना बारबोसू हिला आनंदाची बातमी दिली आहे. जिम्नॅस्टच्या फ्लोर इव्हेंटमध्ये अॅना पराभूत झाली होती. तरीदेखील तिला कांस्यपदक जाहीर झालं आहे. यासह न्यायालयाने अमेरिकेची जिम्नॅस्ट जॉर्डन चाइल्सला जाहीर केलेलं कांस्य पदक रद्द केलं आहे. या स्पर्धेत जॉर्डन तिसऱ्या तर अॅना चौथ्या स्थानी होती. जॉर्डनला आता तिचं पदक अॅनाला द्यावं लागणार आहे. हे ही वाचा >> हुकलेली ‘सुवर्ण’संधी, की चितपट झालेले ‘डावपेच’? नेमकं प्रकरण काय? जिम्नॅस्टच्या फ्लोर इव्हेंटच्या अंतिम फेरीत जॉर्डनने १३.७६६ गुण मिळनत तिसरं स्थान पटकावलं होतं. यासह ती गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर होती. त्यामुळे कांस्य पदक देऊन तिचा गौरव करण्यात आला. तर अॅना १३.७०० गुणांसह चौथ्या स्थानावर होती. मात्र अॅना व रोमानियाच्या ऑलिम्पिक समितीने याप्रकरणी क्रीडा लवादाकडे धाव घेतली. त्यानंतर लवादाने अॅनाला कांस्यपदक दिलं जावं असा निकाल दिला आहे. अॅनाने दावा केला होता की जॉर्डनने चुकीच्या पद्धतीने गुण मिळवले होते. त्यामुळे ती तिसऱ्या क्रमांक मिळवू शकली. अॅनाने लवादासमोर जॉर्डनचा खोटेपणा सिद्ध केला. याप्रकरणी प्रदीर्घ सुनावणी झाली आणि अखेर लवादाने अॅनाच्या बाजूने निकाल दिला आहे. हे ही वाचा >> Paris Olympic 2024: “ऑफर चांगली आहे पण…”, भारताच्या ऑलिम्पिक पदकविजेत्या खेळाडूने का नाकारली सरकारी नोकरी? म्हणाला… अन् न्यायालयाने जॉर्डनचे गुण कमी केले या सुनावणीनंतर सीएएसने जॉर्डन चाइल्सचे गुण कमी केले आहेत. सीएएसने दिलेल्या माहितीनुसार अंतिम फेरीत जॉर्डनने १३.६६६ व अॅनाने १३.७०० गुण मिळवले होते. गुण कमी झाल्याने जॉर्डन थेट पाचव्या क्रमांकावर घसरली आहे. तर अॅना तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. यासह न्यायालयाने अॅनाला कांस्य पदक जाहीर केलं आहे. न्यायालयाच्या या निकालामुळे अॅनाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. दरम्यान, जिम्नॅस्टिकच्या फ्लोर इव्हेंटमध्ये ब्राझीलच्या रेबेका आंद्रेडे हिने सुवर्णपदक पटकावलं आहे, तर अमेरिकेच्या सिमोने बिलेसने रौप्य पदक जिंकलं.