जपानमध्ये करोनाचा प्रादूर्भाव झपाटय़ाने होत असून टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धा वर्षभराने लांबणीवर टाकण्यात आली असली तरी पुढील वर्षीही म्हणजेच २०२१मध्येही या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे आयोजन शक्य नाही, असे संकेत संयोजन समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तोशिरो मुटो यांनी दिले आहेत.

करोना विषाणूचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी जपानचे पंतप्रधान शिंझो आबे हे या आठवडय़ात देशात आणीबाणी जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण देशावर मर्यादा लादल्या जाणार आहेत. ‘‘टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धा १६ महिन्यांनी लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी पुढील वर्षी जुलै किंवा त्यानंतर ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन शक्य आहे, असे मला वाटत नाही. सद्य:स्थितीत आम्ही कोणतेही स्पष्टीकरण देण्याच्या मन:स्थितीत नाहीत,’’ असे तोशिरो मुटो यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

करोनाशी लढा देताना धीम्या गतीने निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान आबे यांच्यावर टीका होत आहे. आबे यांनी अद्याप करोना विषाणूचे गांभीर्य ओळखले नसून ते ऑलिम्पिक स्पर्धा घेण्यासाठी आग्रही आहेत, अशी टीका विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केली आहे.

‘‘आम्ही याआधीच एका वर्षांने ऑलिम्पिक स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ आम्ही स्पर्धेसाठी कसून तयारी करत आहोत. करोना विषाणूवर नियंत्रण मिळून पुढील वर्षी ऑलिम्पिक स्पर्धेचे यशस्वी आयोजन व्हावे, अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. पर्यायी योजना शोधण्यापेक्षा आम्ही आमचे प्रामाणिक प्रयत्न करत आहोत,’’ असेही मुटो यांनी सांगितले. जपानमध्ये सद्यस्थितीला ५ हजारपेक्षा जास्त लोकांना करोनाची बाधा झाली असून आतापर्यंत १००पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे.

टोक्यो ऑलिम्पिकसाठीचा खर्च कित्येक पटींनी वाढला आहे, याबाबतचे स्पष्टीकरण देण्याची मागणी मुटो यांच्याकडून करण्यात येत आहे. ‘‘लवकरच आम्ही खर्चाचा आकडा जाहीर करणार आहोत. टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेच्या अनेक बाबतीतचा विमा उतरवण्यात आला आहे. पण लांबणीवर टाकलेल्या ऑलिम्पिकचा खर्च कुठून वसूल करायचा, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही,’’ असे मुटो म्हणाले.

ऑलिम्पिक ज्योतीबाबत मुटो यांनी सांगितले की, ‘‘ऑलिम्पिक ज्योत जपानमध्ये दाखल झाली असून त्याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकारी टोक्यो २०२०च्या व्यवस्थापन मंडळाकडे आहे. त्यामुळे त्याबाबत मी काहीही भाष्य करणार नाही.’’ करोनाविरोधी लढा दिल्याचे प्रतीक म्हणून ही ज्योत जगभर फिरवण्यात येणार आहे, अशी शक्यता वर्तवली जात आहे.