ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवरून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (कॅब) यांच्याशी गेले पाच दिवस एकहाती लढा देणारे क्युरेटर प्रबिर मुखर्जी यांनी पुन्हा एकदा धोनीवर शरसंधान साधले आहे. कसोटी सामना तीन दिवसांत संपावा, अशी भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीची इच्छा आहे, असे मुखर्जी यांनी म्हटले आहे.
‘‘भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी ईडन गार्डन्सची खेळपट्टी फिरकी गोलंदाजीसाठी अनुकूल असावी, अशी मागणी धोनीने केली आहे. संयोजक पाच दिवसांसाठी सामन्याची तिकिटे विकत असतात, फिरकी गोलंदाजीला साथ मिळणाऱ्या खेळपट्टय़ांवर तीन दिवसातही सामन्याचा निकाल लागू शकतो. मग लोकांनी दोन दिवसाच्या खेळाला का मुकावे? खेळपट्टीमध्ये अशाप्रकारचे तत्त्वहीन बदल मी माझ्या आयुष्यात कधीही केले नाहीत. त्यामुळे धोनीची ही मागणी अयोग्य आहे,’’ असे मुखर्जी म्हणाले.
धोनीने केलेल्या मागणीवर टीका करताना मुखर्जी यांनी सांगितले की, ‘‘धोनीने समजा चंद्र आणून द्या, अशी मागणी केली तर तो आणणे शक्य होईल का? भारतीय संघातील खेळाडू बीसीसीआयशी करारबद्ध असतात. चांगले क्रिकेट खेळण्यासाठी त्यांना चांगले मानधन मिळते. त्यांनी फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टय़ांची मागणी केली तरी त्यांचा त्यांच्या करारावर कोणताही फरक पडणार नाही. प्रत्येक राज्यानुसार तेथील हवामान हे बदलत जाते. खेळपट्टी जशी मुंबईत होती, तशी खेळपट्टी कोलकातात बनणार नाही, कारण कोलकातामधील माती आणि हवामान मुंबईपेक्षा निश्चितच वेगळे आहे.’’
पैसे कमावण्यासाठी मी खेळपट्टय़ा बनवत नाही, याचा पुनरुच्चार करत मुखर्जी म्हणाले, ‘‘ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीला दगाफटका बसेल, असे कोणतेही काम मी करणार नाही. जर कुणाला असे चुकीचे काम करावयाचे असल्यास, त्यास माझी कोणतीही हरकत नसेल.
बीसीसीआयने माझ्या मदतीसाठी दिलेल्या आशीष भौमिक यांच्याविषयी माझे कोणतेही मतभेद नाहीत. ते चांगले व्यक्ती आहेत. त्यांची कारकीर्द आता सुरू झाली आहे, त्यामुळे ते या प्रकरणी काहीही बोलू शकत नाहीत. पण मी कारकीर्दीच्या उंबरठय़ावर येऊन पोहोचलो आहे. म्हणूनच बिनधास्तपणे माझी बाजू मांडत आहे.’’