scorecardresearch

OMG..! आजच्या दिवशी रंगली होती कसोटी क्रिकेटची १ नंबर मॅच; शेवटच्या षटकात होती ६ धावांची गरज अन्…

आजकाल वनडे आणि टी-२०चे अनेक सामने शेवटच्या क्षणापर्यंत जाऊन प्रेक्षकांच्या ह्दयाचे ठोके वाढवतात, पण एक कसोटी सामना असा होता, जो सर्वांच्या मनात कायमस्वरुपी कोरला गेला.

on this day december 14 1960 the first ever tied test in cricket history
जच्या दिवशी झाला होता कसोटी क्रिकेट इतिहासातील पहिला सामना ‘टाय’

कसोटी क्रिकेट हा या खेळाचा सर्वात जुना आणि सर्वात मोठा फॉरमॅट आहे आणि कदाचित याच कारणामुळे कसोटी क्रिकेट सामन्यांमध्ये मैदानावर फारसे प्रेक्षक नसतात, पण एक काळ असा होता, की जेव्हा कसोटी सामना व्हायचा, तेव्हा मैदानात प्रचंड प्रेक्षक असायचे आणि सामनेही रोमांचक व्हायचे. आजकाल वनडे आणि टी-२०चे अनेक सामने शेवटच्या क्षणापर्यंत जाऊन प्रेक्षकांच्या ह्दयाचे ठोके वाढवतात, पण एक कसोटी सामना असा होता, जो सर्वांच्या मनात कायमस्वरुपी कोरला गेला.

हा सामना आहे १९६०च्या वेस्ट इंडिजच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याबद्दल. त्या मालिकेतील पहिला कसोटी सामना ऑस्ट्रेलिया आणि पाहुण्या वेस्ट इंडिज संघादरम्यान ब्रिस्बेन (गाबा) मैदानावर खेळला गेला. त्या काळातही कसोटी सामने पाच दिवसांचे असायचे, फरक एवढाच होता की, विश्रांतीसाठी मध्यभागी एक दिवस असायचा, म्हणजे सामना सहा दिवसांचा असायचा. याशिवाय त्या काळात एका षटकात आठ चेंडू असायचे.

दोन्ही संघांदरम्यान ९ ते १४ डिसेंबरदरम्यान मालिकेतील पहिला कसोटी सामना झाला होता. या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी निवडली. पहिल्या डावात सर गॅरी सोबर्स यांनी १३२ धावांची दमदार खेळी केली. सोबतच तत्कालीन कर्णधार सर फ्रँक वॉरेल आणि जो सोलेमन यांनी प्रत्येकी ६५ धावा केल्या होत्या. त्यामुळे वेस्ट इंडिजने पहिल्या डावात ४५३ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना ऍलन डेविडसन यांनी सर्वाधिक ५ बळी घेतले.

प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावाअखेर ५०५ धावा केल्या होत्या आणि त्यांना ५२ धावांची आघाडी मिळाली. ऑस्ट्रेलियाकडून नॉर्म ओ निल यांनी १८१ तर बॉब सिम्पसन यांनी ९२ धावांचे योगदान दिले होते. वेस्ट इंडिज संघ दुसऱ्या डावात २८४ धावा करु शकला. ऑस्ट्रेलियाकडून ऍलन डेविडसन यांनी ६ फलंदाजांना बाद केले.

हेही वाचा – VIDEO : नादखुळा..! महाराष्ट्राच्या ‘सुपरस्टार’ अंपायरला पाहून सचिननं केलं ट्वीट; प्रसिद्ध व्यक्तीला विचारला प्रश्न!

आता चौथ्या आणि शेवटच्या डावात यजमान ऑस्ट्रेलियासमोर २३३ धावांचे लक्ष्य होते. सामना शेवटच्या दिवशी होता जेव्हा ऑस्ट्रेलियन संघ लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला होता. ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ७ बाद २२७ होती आणि सामना पाचव्या दिवशी शेवटच्या षटकात पोहोचला. शेवटच्या षटकात ८ चेंडूत ऑस्ट्रेलियाला विजयासाठी एकूण ६ धावांची गरज होती आणि त्यांच्या तीन विकेट्स शिल्लक होत्या. वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज वेस हॉल गोलंदाजीसाठी आला. सामन्याच्या शेवटच्या षटकात ऑस्ट्रेलियाला सहा धावा करायच्या होत्या आणि त्यांच्या तीन विकेट शिल्लक होत्या.

शेवटच्या षटकात रंगलेला थरार..!

  • पहिला चेंडू – वॉल ग्रॉउट यांनी लेग बाय धाव घेतली. आता ७ चेंडूत ५ धावा हव्या होत्या.
  • दुसरा चेंडू – रिची बेनाझ यांनी हुक शॉट खेळला पण यष्टीरक्षकाने झेल घेतला. आता फक्त २ विकेट शिल्लक होत्या. ऑस्ट्रेलियाला ६ चेंडूत ५ धावा हव्या होत्या.
  • तिसरा चेंडू – नवीन फलंदाज इयान मॅकॅफी यांनी पहिल्या चेंडूवर एकही धाव घेतली नाही. आता ५ चेंडूत ५ धावा हव्या आहेत.
  • चौथा चेंडू – यावेळी मॅकआयफे यांनी एक धाव घेतली. आता ४ चेंडूत ४ धावा हव्या होत्या.
  • पाचवा चेंडू – या चेंडूवर, ग्राउट यांनी बाउन्सरवर एक शॉट खेळला, ज्यावर क्षेत्ररक्षणातील समन्वयाच्या अभावामुळे झेल सुटला. फलंदाजांनी एक धाव घेतली. आता ३ चेंडूत ३ धावा हव्या होत्या.
  • सहावा चेंडू – वेस हॉल यांच्या या चेंडूवर, मॅकिफे यांनी मिडविकेटच्या सीमारेषेकडे एक शॉट खेळला आणि धाव घेण्यासाठी धावले. दोन्ही फलंदाजांनी चांगल्या गतीने दोन धावा घेतल्या. त्यानंतर ते तिसऱ्या धावेसाठी धावले, पण क्षेत्ररक्षक कॉनराड हंट यांनी एक उत्तम थ्रो थेट यष्टीरक्षकाच्या हातात फेकला आणि ग्रॉउट धाव पूर्ण करण्याआधीच धावबाद झाले. आता ऑस्ट्रेलियाला विजयासाठी २ चेंडूत १ धावांची गरज होती आणि फक्त १ विकेट शिल्लक होती.
  • सातवा चेंडू – या चेंडूवर, नवीन फलंदाज लिंडसे क्लाइन स्क्वेअर लेगच्या दिशेने शॉट खेळला आणि ते विजयी धावेसाठी धावले, पण क्षेत्ररक्षक जो सॅल्मन यांनी अचूक क्षेत्ररक्षण केले, आणि धाव पूर्ण करण्यापूर्वीच चेंडू यष्ट्यांवर मारला. म्हणजेच शेवटची विकेटही पडली आणि सामना टाय झाला.

कसोटी क्रिकेटच्या ८४ वर्षांच्या इतिहासातील हा पहिलाच सामना टाय ठरला. याशिवाय, १९८६ मध्ये चेन्नईमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेलेला कसोटी क्रिकेटमधील एक सामना टाय झाला होता.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: On this day december 14 1 0 the first ever tied test in cricket history adn

ताज्या बातम्या