१३ जुलै, २००२. लॉर्ड्सचे ऐतिहासिक मैदान. याच दिवशी भारताने यजमान इंग्लंडला पराभूत करून नेटवेस्ट सिरीज जिंकली. टीम इंडियाच्या बदलामध्ये हा महत्त्वपूर्ण टप्पा होता. विजयाचे नायक दोन तरुण खेळाडू होते. युवराज सिंग आणि मोहम्मद कैफ. १९ वर्षांखालील संघातून भारताच्या वरिष्ठ संघात येऊन त्यांनी स्वतःचे स्थान निर्माण केले. कैफने ८७ धावा करून भारतीय संघाला जिंकण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

२००२ साली भारत आणि इंग्लंड यांच्यातील नेटवेस्ट मालिकेच्या अंतिम सामन्याची दृश्ये आजही क्रिकेट चाहत्यांच्या मनात कोरली गेली आहेत. युवराज सिंग आणि मोहम्मद कैफची चमकदार सामना जिंकणारी कामगिरी आणि त्यानंतर लॉर्ड्सच्या मैदानावर ‘दादा’ने टी-शर्ट काढून फिरल्याचा प्रसंग क्रिकेटच्या चाहत्यांना कधीच विसरता येणार नाही. आज या सामन्यास १९ वर्षे झाली आहेत.

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने नुकतेच वयाच्या ४९ व्या वर्षात पदार्पण केलं आहे. लॉर्ड्सच्या मैदानात नेटवेस्ट सिरीजमध्ये इंग्लंडचा पराभव केल्यानंतर सौरवने लॉर्ड्सच्या गॅलरीत टी शर्ट काढून केलेलं सेलिब्रेशन आजही अनेकांच्या मनात घर करुन बसलंय.

२००२ साली नासीर हुसेनच्या नेतृत्वात इंग्लंडचा संघ भारताच्या दौऱ्यादरम्यान मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या वन-डे सामन्यात इंग्लंडने भारतावर मात केली होती. अखेरच्या षटकात भारताला विजयासाठी ११ धावांची गरज होती. भारताचे ८ गडी तंबूत परतल्यामुळे मैदानावर असलेल्या हेमांग बदानी आणि अनिल कुंबळेवर संघाला विजय मिळवून देण्याची गरज होती, आणि इंग्लंडचा जलदगती गोलंदाज अँड्रू फ्लिंटॉफ गोलंदाजी करत होता. भारताला ३ चेंडुंमध्ये ६ धावांची गरज होती. मात्र त्यानंतर लागोपाठ २ चेंडुंमध्ये भारताचे दोन्ही फलंदाज बाद झाले आणि आनंदाच्या भरात अँड्रू फ्लिंटॉफने आपला टी-शर्ट काढत मैदानावर सेलिब्रेशन केलं. कर्णधार सौरव गांगुलीला ही गोष्ट त्यावेळी खटकली होती.

काय घडलं होतं १३ जुलै २००२ रोजी?

फ्लिंटॉफच्या या कृतीचा बदला सौरव गांगुलीने त्याच्याच देशात घेतला. १३ जुलैला ऐतिहासीक लॉर्ड्स मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यात नेटवेस्ट सिरीजचा अंतिम सामन्यात इंग्लंडने दिलेल्या ३२५ धावांचा पाठलाग करताना भारताने चांगली सुरुवात केली होती. युवराज सिंह आणि मोहम्मद कैफने भारताचा डावा सावरला. अखेरच्या षटकात भारताचे ८ गडी माघारी परतले होते आणि मोहम्मद कैफच्या मदतीला जहीर खान मैदानावर हजर होता. भारताला विजयासाठी २ धावा हव्या असताना, जहीर खानने एक चोरटी धाव घेतली, मात्र ओव्हरथ्रोमुळे भारतीयांनी आणखी एक धाव काढली आणि थरारक सामना आपल्या खिशात घातला.

योगायोगाने या सामन्यातलं अखेरचं षटकही फ्लिंटॉफ टाकत होता. त्यामुळे भारताच्या जुन्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी लॉर्ड्सच्या गॅलरीत बसलेल्या सौरव गांगुलीने आपला टी-शर्ट काढत जोरदार हवेत गरागरा फिरवतं आपला आनंद साजरा केला. भारतीय संघाच्या इतिहासात हा सामना सदैव सुवर्णअक्षरात लिहीला जाईल. मात्र सौरव गांगुलीचं हे सेलिब्रेशन खासकरुन फ्लिंटॉफच्या सदैव स्मरणात राहिल यात काही शंका नाही.