सचिन तेंडुलकर हे क्रिकेट जगातील सर्वात मोठे नाव आहे. 2012मध्ये आजच्या  दिवशी त्याने पाकिस्तान विरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. या सामन्यात त्याने अर्धशतक झळकावले होते. पण सामन्यातील सर्वात मोठे आकर्षण हा विराट कोहली ठरला होता. या सामन्यात पाकिस्तानला पराभूत करून टीम इंडियाने सचिन तेंडुलकरला शानदार निरोप दिला.

पाकिस्तानचे मोठे आव्हान

एशिया कपच्या या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार मिसबाह-उल-हकने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मोहम्मद हाफिज (105) आणि नासिर जमशेद (112) यांनी संघाला शानदार सुरुवात करुन दिली. दोघांनी शतके ठोकली आणि पहिल्या विकेटसाठी 224 धावांची मोठी भागीदारी केली. युनूस खाननेही 52 धावा केल्या. प्रथम खेळताना पाकिस्तानने 6 बाद 329 धावांची मोठी धावसंख्या उभारली होती. टीम इंडियाकडून वेगवान गोलंदाज प्रवीण कुमार आणि अशोक दिंडा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

विराट कोहलीचे संस्मरणीय शतक

लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने खराब सुरुवात केली. दुसर्‍या चेंडूवर मोहम्मद हाफिजने गौतम गंभीरला (0) बाद केले. यानंतर सचिन तेंडुलकर (52) आणि विराट कोहली (183) यांनी दुसर्‍या विकेटसाठी 133 धावांची मोठी भागीदारी केली. विराटने 148 चेंडूंचा सामना करत संस्मरणीय शतकी खेळी केली. या खेळीत त्याने 22 चौकार आणि 1 षटकार लगावला. त्याच्या वनडे कारकिर्दीतील ही त्याची सर्वात मोठी खेळी होती. रोहित शर्मानेही 68 धावांचे योगदान दिले. टीम इंडियाने 47.5 षटकांत 4 गडी गमावून हे लक्ष्य गाठले.

पाकिस्तानविरुद्ध सर्वात मोठा विजय

टीम इंडियाने पाकिस्तानच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करत हा सामना खिशात घातला. पाकिस्तानविरुद्धचा हा भारताचा सर्वात मोठा विजय ठरला. ढाका येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात महेंद्रसिंह धोनी भारताचा कर्णधार होता. सचिनच्या एकदिवसीय कारकीर्दीबद्दल सांगायचे झाले तर, त्याने 463 सामने खेळले आहेत. यात त्याने 49 शतकांसह 18,426 धावा केल्या आहेत.

सचिनची क्रिकेट कारकीर्द –

सचिन 200 कसोटी सामने खेळणारा आणि 100 आंतरराष्ट्रीय शतके ठोकणारा जगातील एकमेव फलंदाज आहे. त्याने कसोटी सामन्यात 53.78 च्या सरासरीने आणि 51 शतकांसह 15 हजार 921 धावा केल्या. तर, एकदिवसीय सामन्यामध्ये 44.83 च्या सरासरीने  धावा बनवल्या आहेत. यामध्ये त्याच्या 49 शतके आणि 96 अर्धशतकांचा समावेश आहे. सचिनने 2013मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.