मुंबई गटात अव्वल गुजरात स्पर्धेतून बाहेर शार्दूलचे सहा बळी

रणजी स्पर्धेच्या अखेरच्या साखळी सामन्यात उपांत्यपूर्व फेरीत पोहोचण्याचे स्वप्न घेऊन गुजरातचा संघ वानखेडेवर उतरला होता; पण त्यांचे हे स्वप्न मुंबईने पुन्हा एकदा धुळीस मिळवले. गेल्या चार वर्षांमध्ये गुजरातला तीनदा उपांत्यपूर्व फेरीत जाण्याची संधी होती, पण मुंबईने तिन्ही वेळा गुजरातला साखळी फेरीतूनच माघारी धाडले. पहिल्या डावात भार्गव मेराईच्या दीडशतकाच्या जोरावर गुजरातने ४२१ धावा केल्या. वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरने या वेळी गुजरातच्या सहा फलंदाजांना बाद करण्याचा पराक्रम केला. मुंबईने चौथ्या दिवसअखेर ६ बाद २२७ अशी मजल मारली. या सामन्यात मुंबईने पहिल्या डावात आघाडी मिळवत तीन गुणांची कमाई केली, तर गुजरातला एका गुणावर समाधान मानावे लागले.
गुजरातला उपांत्यपूर्व फेरीत पात्र ठरण्यासाठी फलंदाजी करताना चारच्या सरासरीने धावा करायच्या होत्या. त्याचबरोबर मुंबईला त्यांना ७४ षटकांत २१९ धावसंख्येमध्ये रोखणे भाग होते; पण मुंबईने त्यांच्या आशेवर पाणी फिरवले. सकाळी तासाभरात मुंबईने गुजरातच्या संघाला गुंडाळले. गुरुवारी दीडशतक झळकावणाऱ्या भार्गवला चौथ्या दिवशी फक्त १६ धावांची भर घालता आली. भार्गवने १६ चौकारांच्या जोरावर १६६ धावांची अप्रतिम खेळी साकारली, पण त्याची ही खेळी संघाला उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचवू शकली नाही. त्यानंतर अखेरचा सामना खेळणाऱ्या रमेश पोवारने ६ चौकारांच्या जोरावर ३४ धावा केल्या. पोवारला बाद करत मुंबईने गुजरातच्या पहिल्या डावापुढे पूर्णविराम दिला.
मुंबईने दुसऱ्या डावाची सकारात्मक सुरुवात केली. उपाहारापर्यंत त्यांनी १४ षटकांमध्ये बिनबाद ४७ धावा केल्या. उपहारानंतर त्यांनी मोठे फटके मारण्यावर भर देत धावसंख्या फुगवण्याचा प्रयत्न केला, पण मुंबईच्या एकाही फलंदाजाला अर्धशतकी मजल मारता आली नाही.

संक्षिप्त धावफलक
मुंबई (पहिला डाव) : ५३१
गुजरात (पहिला डाव) १३९.४ षटकांत सर्व बाद ४२१ (भार्गव मेराई १६६; शार्दूल ठाकूर ६/१०७)
मुंबई (दुसरा डाव) : ६५ षटकांत ६ बाद २२७ (निखिल पाटील नाबाद ४४; रुजूल भट्ट ४/७६).