पुणे : आर्थिक अडचणीमुळे कुमार आणि किशोर गटांच्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धाच्या यजमानपदासाठी जिल्हा संघटना किंवा आयोजक पुढे येत नाहीत. त्यामुळे हा आर्थिक भार कमी करण्यासाठी राज्य संघटना अर्थसाहाय्य करील, असे महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे सचिव आस्वाद पाटील यांनी सांगितले.

पुणे, म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलाती उपाध्यक्ष दिनकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी ६४वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. ‘‘कबड्डीत सर्वोत्तम खेळाडू घडवण्याकरिता संलग्न जिल्ह्यांत राज्य संघटनेकडून प्रशिक्षक व तंदुरुस्ती तज्ज्ञ पाठवले जातील. याचप्रमाणे वरिष्ठ व कुमार गटांच्या खेळाडूंचे एकत्रित वर्षभर काही प्रशिक्षण शिबिरे घेण्यात येणार आहेत,’’ असे पाटील यांनी सांगितले.

कबड्डी दिनाच्या कार्यक्रमात दोन-चार पुरस्कारार्थी वगळता इतर सर्व उपस्थित होते. राज्य संघटनेचे उपाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले.