Ottneil Baartman Hattrick: सध्या दक्षिण आफ्रिकेत SA २० लीग स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेतील २५ वा सामना प्रिटोरीया कॅपिटल्स आणि पार्ल रॉयल्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. सेंचुरियनच्या सुपर स्पोर्ट पार्कमध्ये पार पडलेल्या सामन्यात पार्ल रॉयल्स संघाने ६ गडी राखून बाजी मारली. हा सामना जिंकून पार्ल रॉयल्सने प्लेऑफमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या प्रिटोरिया कॅपिटल्स संघाने १९.१ षटकात १२७ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पार्ल रॉयल्स संघाने दिलेलं आव्हान अवघ्या १५.१ षटकात पूर्ण केलं आणि दमदार विजयाची नोंद केली.
या सामन्यात पार्ल रॉयल्सला विजय मिळवून देण्यात वेगवान गोलंदाज ओटनील बार्टमेनने मोलाची भूमिका बजावली. मुख्य बाब म्हणजे, आयपीएल २०२६ स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात ओटनील बार्टमेन अन्सोल्ड राहिला होता. मात्र SA२० लीग स्पर्धेत खेळताना त्याने दमदार कामगिरी केली आहे. या सामन्यात गोलंदाजी करताना त्याने हॅट्रिक घेतली आणि ५ गडी बाद केले.
अशी कामगिरी करणारा ठरला दुसराच गोलंदाज
ओटनील बार्टमेनने या सामन्यात गोलंदाजी करताना दमदार गोलंदाजी केली. त्याने ४ षटकं टाकली यादरम्यान त्याने अवघ्या १६ धावा खर्च केल्या आणि ५ गडी बाद केले. यादरम्यान त्याने १ निर्धाव षटक टाकलं. ओटनील बार्टमेन हा या स्पर्धेत हॅट्रिक घेणारा दुसराच गोलंदाज ठरला आहे. याआधी वेगवान गोलंदाज लुंगी एन्गिडीने या स्पर्धेत हॅट्रिक घेण्याचा पराक्रम केला होता. ओटनील बार्टमेनने या सामन्यातील १९ व्या षटकात हा पराक्रम केला. त्याने षटकातील पहिल्याच चेंडूवर आंद्रे रसेलला झेलबाद करत माघारी धाडलं. तर दुसऱ्या चेंडूवर त्याने लिजाद विलियम्सला क्लिन बोल्ड केलं. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर त्याने लुंगी एन्गिडीला बाद करत हॅट्रिक पूर्ण केली.
पार्ल रॉयल्सचा प्लेऑफ्समध्ये प्रवेश
या विजयासह पार्ल रॉयल्स संघाने स्पर्धेतील प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. पार्ल रॉयल्स संघाने या स्पर्धेतील ८ पैकी ५ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. या दमदार कामगिरीसह पार्ल रॉयल्सचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला आहे. या संघाने आतापर्यंत २४ गुणांची कमाई केली आहे. यासह सनरायझर्स ईस्टर्न केप टाऊन संघाने देखील प्लेऑफमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. पार्ल रॉयल्स संघाने प्लेऑफमध्ये तर प्रवेश केला आहे. आता हा संघ टॉप २ मध्ये कायम राहण्याच्या प्रयत्नात असणार आहे. त्यामुळे स्पर्धेतील पुढील सामने या संघासाठी अतिशय महत्वाचे असणार आहेत.
