लंडन : नॉन-स्ट्राईकवरील (गोलंदाजाच्या बाजूकडील) फलंदाजाने चेंडू टाकण्यापूर्वी क्रीज सोडल्यास तिला धावबाद करणे हे नियमाला धरूनच आहे. त्यामुळे आम्ही कोणताही गुन्हा केलेला नाही, अशी प्रतिक्रिया भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने व्यक्त केली.

रविवारी झालेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडला १६ धावांनी पराभूत केले. भारताची फिरकी गोलंदाज दीप्ती शर्माने आपल्या बाजूकडील फलंदाजाला धावबाद करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. १७० धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची ९ बाद ११८ अशी स्थिती होती. मात्र, चार्ली डीनने (८० चेंडूत ४७ धावा) झुंजार खेळी करत इंग्लंडच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या. परंतु ४३वे षटक टाकणाऱ्या दीप्तीने नॉन-स्ट्राईकवरील डीनला धावबाद केले. त्यामुळे इंग्लंडच्या आजी-माजी खेळाडूंकडून खिलाडूवृत्तीचा मुद्दा उपस्थित केला गेला. मात्र, हरमनप्रीतने दीप्तीच्या कृतीचे समर्थन केले.

‘‘दीप्तीने केलेली कृती नियमाला धरूनच होती. आमच्याकडून काही गुन्हा झाला आहे, असे मला वाटत नाही. हा खेळाचा एक भाग आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा (आयसीसी) हा नियम आहे. त्यामुळे माझे दीप्तीला पूर्ण समर्थन आहे,’’ असे हरमनप्रीत म्हणाली. गोलंदाजांकडून नॉन-स्ट्रायकरकडील फलंदाजाला बाद ठरवणारी पद्धत आता धावबाद म्हणून ग्राह्य धरली जाईल, असे ‘आयसीसी’ने नुकतेच स्पष्ट केले होते.