Shai Hope Statement: आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत आतापर्यंत एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळाले आहेत. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील महत्वाचा सामना चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्याआधी झालेला सामना दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये पार पडला. हा सामना देखील सेमी फायनलच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा होता. हा सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेने सेमी फायनलमध्ये आपलं स्थान जवळजवळ निश्चित केलं आहे. तर भारतीय संघाला सेमी फायनलमध्ये जाण्याची संधी निर्माण करून दिली आहे. दरम्यान या सामन्याच्या निकालानंतर वेस्ट इंडिजचा कर्णधार शे होप काय म्हणाला? जाणून घ्या.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात वेस्ट इंडिजचा संघ पहिल्या डावात फलंदाजीला उतरला होता. वेस्ट इंडिजला सुरुवातीला मोठे धक्के बसले होते. पण शेवटी वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी तुफान फटकेबाजी केली आणि संघाची धावसंख्या ८ गडी बाद १७६ धावांपर्यंत पोहोचवली. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने १६.१ षटकात दिलेलं आव्हान पूर्ण केलं आणि ९ गडी राखून विजय मिळवला.
पराभवानंतर शे होप काय म्हणाला?
शे होप म्हणाला, “खेळपट्टी होती हे मला माहीत नाही. पण मोठी धावसंख्या उभारणं खूप महत्वाचं होतं. पावरप्लेमध्ये इतक्या विकेट्स गेल्यामुळे आम्ही बॅकफूटवर होतो. खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली होती. पण शेवटी आम्ही ४०-५० धावा कमी केल्या. सुरूवातीला विकेट्स गेल्या, पण खालच्या फळीतील फलंदाजांचे कौतुक करायला हवे. त्यांनी आम्हाला सामन्यात टिकवून ठेवण्याची संधी दिली. आम्ही पावरप्लेमध्ये काही विकेट्स घेतल्या असत्या तर चित्र वेगळं असतं.
वेस्ट इंडिजचा पुढील सामना भारतीय संघासोबत होणार आहे. या सामन्याबाबत बोलताना तो म्हणाला, “प्रत्येक गोष्ट सहज मिळणार नाही. आपल्याला आपल्या आव्हानांवर मात करण्याचे मार्ग शोधावे लागतील. आम्ही ज्या प्रकारचं क्रिकेट खेळत आहोत, त्यात आमचा एक पराभव झाला आहे. कधी कधी स्पर्धेच्या सुरवातीलाच पराभव होणं चांगलं असतं. कारण आता आम्हाला पुढील सामन्याचे महत्व समजले आहे. आम्ही यापुढील सामन्याकडे ‘पहिली फायनल’ म्हणून पाहत आहोत. आशा करतो त्यानंतरही आम्हाला आणखी फायनल खेळायला मिळतील.” भारतीय संघाने जर झिम्बाब्वेला पराभूत केलं, तर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात होणारा सामना हा दोन्ही संघांसाठी नॉकआऊट सामना असणार आहे.

