मुंबई : भारताचे आघाडीचे बुद्धिबळपटू जगज्जेता दोम्माराजू गुकेश, आर. प्रज्ञानंद आणि अर्जुन एरिगेसी यांना अलीकडच्या काळात सातत्याने यश मिळवता आलेले नाही. टाटा स्टील स्पर्धेतील त्यांची कामगिरी अपेक्षेप्रमाणे न ठरल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या अपयशामागे एक महत्त्वाचे कारण म्हणजे अतिप्रमाणात स्पर्धांमध्ये सहभाग, ज्याचा थेट परिणाम त्यांच्या मानसिकतेवर होताना दिसतो. ते ताजेतवाने राहत नाहीत. त्यामुळे त्यांनी आता आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, असे मत ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू प्रवीण ठिपसे यांनी व्यक्त केले.
गुकेश, प्रज्ञानंद आणि अर्जुन हे तिघेही जवळपास वर्षभर सातत्याने विविध स्पर्धांमध्ये खेळत आहेत. बुद्धिबळ हा केवळ कौशल्याचा नव्हे, तर तीव्र मानसिक क्षमतेचा खेळ आहे. वर्षातील ३६५ दिवस सर्वोत्तम पातळीवर खेळणे कोणालाही शक्य नसते. फॅबियानो कारूआना आणि हिकारू नाकामुरा यांसारखे अव्वल खेळाडू मर्यादित स्पर्धा खेळून स्वतःला विश्रांती देतात, तर भारतीय खेळाडू मात्र सतत स्पर्धांच्या चक्रात अडकलेले दिसतात. आर्थिक प्रलोभने, उपस्थिती शुल्क आणि आयोजकांशी असलेले संबंध यामुळे स्पर्धांना नकार देणे त्यांना अवघड जाते, असेही ठिपसे म्हणाले.
कामगिरी घसरण्यामागे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे नैसर्गिक शैलीचा अभाव. आजच्या स्पर्धात्मक बुद्धिबळात सुरुवातीच्या चाली प्रामुख्याने प्रशिक्षकांकडून मिळतात. त्यामुळे खेळाडूंना तयार योजना मिळतात, पण त्या त्यांच्या मूळ शैलीला साजेशा असतातच असे नाही. पुस्तकी तयारी संपल्यानंतर खेळाडू अपरिचित स्थितीत अडकतात आणि चुका वाढतात. विशेषतः गुकेश, जो २०२२-२३ मध्ये अत्यंत अचूक आणि स्वतःच्या विशेष शैलीतील खेळासाठी ओळखला जात होता, तो सध्या त्याच्या नैसर्गिक प्रवृत्तीपासून दूर गेलेला दिसतो, असे निरीक्षणही ठिपसे यांनी नोंदवले.
याशिवाय, हे खेळाडू प्रामुख्याने आमंत्रितांच्या स्पर्धांमध्येच खेळत असल्याने त्यांना मर्यादित प्रतिस्पर्ध्यांचा सामना करावा लागतो. अशा स्पर्धांमध्ये बहुतेक सामन्यांत धोका न पत्करता बरोबरी स्वीकारली जाते. परिणामी आक्रमकता, धोरणात्मक धार आणि तात्काळ निर्णयक्षमता कमी होते, असेही ठिपसे म्हणाले.
यंदाचे वर्ष या तिघांसाठी अत्यंत निर्णायक आहे. जागतिक अजिंक्यपद, ऑलिम्पियाड आणि कँडिडेट्स अशा महत्त्वाच्या स्पर्धांपूर्वी त्यांना विश्रांती, आत्मपरीक्षण आणि नैसर्गिक शैलीकडे परतण्याची नितांत गरज आहे. अन्यथा, अति स्पर्धांचा ताण त्यांच्या दीर्घकालीन कारकीर्दीसाठी धोकादायक ठरू शकतो, असे ठिपसे यांनी नमूद केले.

