सौम्या स्वामीनाथनला उपविजेतेपद
पुण्याची सौम्या स्वामीनाथन हिने आपलीच सहकारी स्वाती घाटे हिच्यावर मात करीत महिलांच्या राष्ट्रीय प्रीमिअर बुद्धिबळ स्पर्धेत उपविजेतेपद पटकाविले. ओडिशाच्या पद्मिनी राऊत हिने सोमवारीच साडेआठ गुणासंह विजेतेपद निश्चित केले होते.
या स्पर्धेत पद्मिनी हिने गतवर्षीही विजेतेपद मिळविले होते. दोन वेळा ही स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम यापूर्वी जयश्री खाडिलकर, रोहिणी खाडिलकर, भाग्यश्री ठिपसे, अनुपमा गोखले, एस.विजयालक्ष्मी, तानिया सचदेव, मेरी अ‍ॅन गोम्स यांनी केला आहे. पद्मिनी हिने विजेतेपदाबरोबरच पावणे दोन लाख रुपयांची कमाई केली. शेवटच्या फेरीत तिला तामिळनाडूच्या के.प्रियंका हिच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. मात्र सोमवारीच तिने अन्य खेळाडूंपेक्षा एका गुणाची आघाडी घेत विजेतेपद निश्चित केले होते. तिने अकरा फेऱ्यांमध्ये आठ डावजिंकले तर एक डाव बरोबरीत सोडविला. दोन डावांमध्ये तिला पराभव स्वीकारावा लागला.
सौम्या व स्वाती या दोन्ही पुण्याच्या खेळाडूंमधील डाव अतिशय रंगतदार झाला. सौम्या हिने पांढऱ्या मोहरांनी खेळण्याचा फायदा घेत विजय मिळविला. सौम्या (पेट्रोलियम मंडळ), स्वाती (आयुर्विमा मंडळ) व गोव्याची भक्ती कुलकर्णी (एअर इंडिया) यांचे प्रत्येकी साडेसात गुण झाले. प्रगत गुणांच्या आधारे सौम्या, भक्ती व स्वाती यांना अनुक्रमे दोन ते चार क्रमांक देण्यात आले.
भक्ती हिने शेवटच्या फेरीत नेहा सिंग हिला पराभूत केले. प्रत्युषा बोड्डा हिला पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.