Ball Colour Change In PSL 2026: पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेला गुरूवारपासून सुरुवात झाली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि पाकिस्तानच्या क्रिकेट चाहत्यांकडून ही जगातील सर्वोत्तम क्रिकेट लीग आहे, असा दावा केला जातो. पण स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची फजिती झाल्याचे पाहायला मिळाले आहे. स्पर्धेतील पहिला सामना लाहोर कलंदर्स आणि हैदराबाद किंग्समेन या दोन्ही संघांमध्ये पार पडला. लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये पार पडलेल्या या सामन्यात असं काही घडलं, जे याआधी क्वचितच घडलं असावं.

या सामन्यात लाहोर कलंदर्स संघाने नाणेफेक जिंकून हैदराबाद किंग्समेन या संघाला गोलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. या स्पर्धेत हैदराबाद किंग्समेन संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी मार्नस लाबुशेनकडे सोपवण्यात आली आहे. हैदराबाद किंग्समेनची गोलंदाजी सुरू असताना, पांढरा चेंडू अचानक गुलाबी झाला. हे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

पांढरा चेंडू गुलाबी कसा झाला?

तर झाले असे की, हैदराबाद किंग्समेन संघाची गोलंदाजी सुरू असताना, पांढऱ्या रंगाचा चेंडू गुलाबी झाला. चेंडूवरील चकाकी कायम ठेवण्यासाठी खेळाडू चेंडू आपल्या जर्सीला घासतात. पण पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेसाठी वापरण्यात येणाऱ्या जर्सीची क्वालिटी इतकी खराब आहे की, खेळाडूंनी चेंडू जर्सीला घासल्यामुळे जर्सीचा रंग चेंडूला लागला. त्यामुळे पांढऱ्या रंगाचा नवा चेंडू गुलाबी झाला. क्रिकेटमध्ये असं याधी कधीच घडलं नव्हतं. पण पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत काहीही होऊ शकतं, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागला आहे. दरम्यान नेटकऱ्यांनीही भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले, “वेलकम टू पैसा शॉर्ट लीग…जर्सीची क्वालिटी इतकी खराब आहे की, चेंडू जर्सीला घासताच पांढरा चेंडू गुलाबी झाला. पाकिस्तान गुलाबी चेंडूने टी-२० लीग होस्ट करणारा पहिलाच देश बनला…”. तर आणखी एका युजरने पोस्ट शेअर करत लिहिले की, “पाकिस्तान क्रिकेट लीग ही जगातील सर्वात मोठी भंकस लीग आहे..” हे मजेशीर पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या लाहोर कलंदर्स संघाने २० षटकांअखेर ६ गडी बाद १९९ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या हैदराबाद किंग्समेन संघाचा डाव अवघ्या १३० धावांवर आटोपला. यासह लाहोरने हा सामना ६९ धावांनी आपल्या नावावर केला.