पाकिस्तानने ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवत टी२० वर्ल्डकपसाठी तय्यार असल्याचं सिद्ध केलं. तिसऱ्या टी२० सामन्यात पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला १११ धावांनी नमवलं. टी२० प्रकारातला ऑस्ट्रेलियाचा हा सगळ्यात मोठ्या फरकाने पराभव आहे. या विजयासह पाकिस्तानने तीन सामन्यांच्या मालिकेत निर्भेळ यश मिळवलं. पाकिस्तानने २० षटकात २०७ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरादाखल खेळताना ऑस्ट्रेलियाचा डाव ९६ धावांतच गडगडला.

पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना दोनशेपल्याड धावसंख्या उभारली. सलामीवीर सईम अयुबने ५६ तर बाबर आझमने ५० धावांची खेळी केली. शदाब खानने ४६ धावा केल्या. ऑस्ट्रेलियातर्फे बेन ड्वारशियासने २ विकेट्स घेतल्या.

प्रत्युत्तरादाखल खेळताना ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती स्वीकारली. वर्ल्डकपसाठी सराव म्हणून या मालिकेचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र प्रत्यक्षात ऑस्ट्रेलियाच्या खेळातल्या उणीवाच स्पष्ट झाल्या. कर्णधार मिचेल मार्श केवळ एक धाव करू शकला. मार्कस स्टॉइनसने २३ तर कॅमेरुन ग्रीनने २२ धावा केल्या. वर्ल्डकप संघात संधी मिळालेला मॅट रेनशॉही एकच धाव करू शकला. जोश फिलीपने १४ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या ७ फलंदाजांना एकेरी धावसंख्याही गाठता आली नाही. दुखापतीमुळे अ‍ॅडम झंपा फलंदाजीला आला नाही.

पाकिस्तानतर्फे मोहम्मद नवाझने १८ धावांच्या मोबदल्यात ५ विकेट्स टिपल्या. शाहीन शहा आफ्रिदीने २ विकेट्स घेत त्याला चांगली साथ दिली. झंपा ऑस्ट्रेलियाचं प्रमुख अस्त्र आहे. टी२० वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर झंपा दुखापतग्रस्त होणं ऑस्ट्रेलियाच्या चिंतेत भर टाकणारं आहे. दोन षटकं गोलंदाजी केल्यानंतर झंपा ड्रेसिंगरुममध्ये परतला. त्यानंतर तो मैदानात परतला नाही. ऑस्ट्रेलियाचा वनडे आणि टेस्ट कर्णधार पॅट कमिन्स दुखापतीमुळे वर्ल्डकप स्पर्धेत खेळू शकणार नाही हे स्पष्ट झालं आहे.

या मालिकेत पाकिस्तानने पहिली लढत २२ धावांनी जिंकली. दुसऱ्या लढतीत त्यांनी ९० धावांनी विजय मिळवला होता. या कामगिरीत सुधारणा करत पाकिस्तानने तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला मोठ्या फरकाने पराभूत केलं. कर्णधार सलमान अघा आणि सईम अयुबचा फॉर्म ही पाकिस्तानसाठी जमेची बाजू ठरली. खराब कामगिरीमुळे ट्रोलर्सच्या लक्ष्यस्थानी असलेल्या बाबर आझमने तिसऱ्या लढतीत अर्धशतकी खेळी केली. मोहम्मद नवाझने ५ विकेट्स पटकावत वर्ल्डकपसाठी तयार असल्याचं दाखवून दिलं.

ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानने केवळ एकदा टी२० वर्ल्डकप जेतेपदावर नाव कोरलं आहे. दोन्ही संघ वर्ल्डकपसाठी रवाना होणार आहेत.