PAK vs NED Match Highlights in Marathi: टी-२० विश्वचषक २०२६ ला सुरूवात झाली असून पाकिस्तान आणि नेदरलँड्स यांच्यात पहिलाच अटीतटीचा सामना खेळवला गेला. नेदरलँड्स संघाने पाकिस्तानला सहज विजय मिळवू दिल नाही आणि नेदरलँड्स अपसेट करण्याच्या जवळ पोहोचली होती. पण फहीम अश्रफने पाकिस्तानला विजय मिळवून दिला. पाकिस्तानने नेदरलँड्सवर अखेरच्या षटकात ३ विकेट्सने विजय मिळवून दिला.

१९ व्या षटकात पाकिस्तानला विजयासाठी १२ चेंडूत २९ धावांची गरज होती. फहीम अश्रफ स्ट्राईकवर होता. त्याने पहिल्याच चेंडूवर षटकार खेचला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरही तो मोठा फटका खेळायला गेला आणि कॅच ड्रॉप झाल्याने तो वाचला. यानंतर त्याने तिसऱ्या चेंडूवर षटकार लगावला. त्यानंतर पाचव्या चेंडूवर षटकार व सहाव्या चेंडूवर चौकार लगावत फहीमने २४ धावा कुटल्या आणि इथेच सामना पाकिस्तानच्या बाजूने फिरला.

नेदरलँड्सने दिलेल्या १४८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानने दणक्यात सुरूवात केली. सयम अयुब व साहिबजादा फरहान या जोडीने चांगली सुरूवात केली. पण सयम अयुब २४ धावा करत झेलबाद झाला. फिरकीपटू आर्यन दत्तने संघाला दोन विकेट्स मिळवून दिल्या आहेत. तर त्यानंतर साहिबजादा फरहान व सलमान अली आघा यांनी शानदार फटकेबाजी केली. तर सलमान १२ धावांवर झेलबाद झाला. यानंतर साहिबजादा फरहान ४७ धावा करत माघारी परतला.

बाबर आझमने संघाला पुन्हा निराश केलं. बाबर आझमने त्याच्या खेळीत १८ चेंडूत एका चौकारासह १५ धावा करत बाद झाला. इथूनही नेट रन रेटचा दबाव वाढत गेला. पहिले ३ फलंदाज वगळता पुढचे कोणतेही फलंदाज मोठी धावसंख्या उभारू शकले नाहीत. फहीम अश्रफने १९व्या षटकात लोगान बीकच्या गोलंदाजीवर एक षटकार मारला आणि पुढच्या चेंडूवर कॅच ड्रॉप झाल्याने त्याला जीवदान मिळालं. यानंतर फहीमने पाकिस्तानला विजय मिळवून दिला.

नेदरलँड्सच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत पाकिस्तानच्या धावांवर अंकुश ठेवला. नेदरलँड्सकडून आर्यन दत्त व व्हॅन मीकरन यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. तर व्हॅन बीक, क्लाईन, व्हॅन डेर मीर्वे यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.

पाकिस्तानने पहिल्या वर्ल्डकप सामन्याची नाणेफेक जिंकत नेदरलँड्सला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. प्रथम फलंदाजी करताना नेदरलँड्स १४७ धावांवर सर्वबाद केलं. नेदरलँड्सच्या फलंदाजांनीही चांगली फलंदाजी केली. मायकेल लेविट २४ धावा करत बाद झाला. तर बास डे लीडेने ३० धावांची तर एकरमनने २० धावांची शानदार खेळी केली. याशिवाय स्कॉट एडवर्ड्सने २९ चेंडूत ३ चौकार व एका षटकारासह ३७ धावांची सर्वात मोठी खेळी केली. तर खालच्या फळीत आर्यन दत्ताने १३ धावांचं महत्त्वाचं योगदान दिलं.

सलमान मिर्झाने ३ विकेट्स घेतल्या. मोहम्मद नवाज, अबरार अहमद, सयम अय्युब यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. तर शाहीनने एक विकेट घेतली. पाकिस्तानने नेदरलँड्सवरील विजयासह गुणतालिकेत २ गुणांचं खातं उघडलं.